त्र्यंबक नाका परिसरात भरधाव दुचाकी बसवर धडकून झालेल्या अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. शुभम कोकाटे (२१, राणाप्रताप चौक, सिडको) आणि शुभम सोनवणे (२१, मूळ भुसावळ, जळगाव) अशी मयत विद्यार्थ्यांची नावे असून जयेश महाजन (२१, म्हसवळ, जळगाव) हा युवक अपघातात जखमी झाला आहे. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास त्र्यंबक रस्त्यावरील ठक्कर बाजार बसस्थानकाबाहेर हा अपघात झाला.

हेही वाचा >>> थॅलेसेमिया रुग्णांसाठी १० लाखांची मदत- डॉ. भारती पवार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृत व त्यांचा जखमी मित्र मध्यरात्री दुचाकीवरुन प्रवास करीत होते. त्र्यंबक नाका परिसरात जेवणासाठी ते हॉटेल शोधत असताना हा अपघात झाला. जिल्हा रूग्णालयाकडून त्र्यंबक नाक्याकडे भरधाव जात असतांना त्र्यंबक नाक्याकडून येणाऱ्या बसने ठक्कर बाजार बस स्थानकाकडे वळण घेतल्याने दुचाकी बसवर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी थेट बसच्या पाठीमागील चाकात सापडल्याने तिचा चक्काचूर झाला. यात शुभम कोकाटे आणि शुभम सोनवणे या दोन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा तिसरा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सोनवणे आणि कोकाटे या दोन्ही कुटुंबातील ही एकुलती एक मुले होती. नातेवाइकांनी सकाळी जिल्हा रुग्णालयात आक्रोश व्यक्त केला. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी पथकासह घटनास्थळी पंचनामा करुन गुन्हा दाखल केला. दरम्यान, शुभम सोनवणे हा जळगाव जिल्ह्यातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी नाशिकमध्ये आला होता. हे तिघे मित्र अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असल्याची पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.