जळगाव – उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील एका जवानासह १९ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. दरम्यान, जळगावमधील तिघांशी बुधवारी संपर्क साधण्यात यश आले होते. उर्वरित १६ पर्यटकांशी सायंकाळी उशिरापर्यंत संपर्क होऊ शकला नव्हता. ज्यामध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावातील १३ तरूणांचाही समावेश होता.

उत्तराखंडमधील धराली गावात ढगफुटी झाल्यानंतर भूसख्खलन होऊन शेकडो घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबली गेली. अनेकजण बेपत्ता झाले असून त्यांचा अद्याप शोध सुरुच आहे. दरम्यान, काशी दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यातूनही अनेक भाविक गेले होते. ढगफुटीच्या घटनेनंतर जिल्ह्यातून गेलेल्या पर्यटकांशी संपर्क होऊ शकत नसल्याने त्यांचे नातेवाईक इकडे चिंतेत आहेत.

धरणगाव शहरातील दोन तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावातील १३ तरुणांशी देखील संपर्क होऊ शकला नसल्याची माहिती समोर आली होती. त्यामध्ये रोहन दिनेश माळी, रोहित बंडू माळी, मनोज संजय चौधरी, ज्ञानेश्वर संजय माळी, दीपक रत्नाकर सोनार, सगदीक नन्नवरे, दीपक माळी, वैभव गंगवणे, संदीप माळी, विशाल पाटील, राकेश माळी, भूषण माळी आणि पवन यांचा समावेश होता. याशिवाय, पाचोरा तालुक्यातील जवान सोपान अहिरे हे उत्तराखंडमधील दुर्घटनाग्रस्त भागात कर्तव्यावर होते. त्यांच्याशी देखील संपर्क होऊ शकला नाही. संबंधित पर्यटकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटले होते.

दरम्यान, पाळधी गावातील १३ तरुण २७ जुलै रोजी खासगी बसने उत्तराखंडकडे निघाले होते. कुटुंबातील व्यक्तींशी त्यांचा शेवटचा संपर्क मंगळवारी दुपारी झाला होता. त्यानंतर त्या युवकांचा संपर्क होऊ न शकल्यामुळे नातेवाईक चिंतेत पडले होते. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील तातडीने दिल्ली रवाना झाले. त्यांनी आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधत पाळधी गावातील तरुणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अखेर गुरुवारी सकाळी सर्व तरुणांशी संपर्क साधण्यात यश आले. त्यांनीही तिकडून पाळधी परिवारातील सदस्यांशी संवाद साधला. तेव्हा सर्वांच्या जीवात जीव आला. सध्या गंगोत्रीमध्ये अडकलेल्या त्या तरुणांना खाली उतरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

उत्तरकाशी दुर्घटनेमुळे जळगावमधील अयोध्या नगरातील अनामिका मेहरा, आरोही मेहरा आणि रुपेश मेहरा हे एकाच कुटुंबातील तिन्ही जणही अडकले होते. कुटुंबियांचा त्यांच्याशी तिथे भ्रमणध्वनीला नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नव्हता. त्यामुळे चिंतेत असलेल्या जळगावातील मेहरा कुटुंबाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उत्तरकाशी येथे संपर्क साधून तिन्ही जण थांबलेल्या गेस्ट हाऊसच्या मालकाशी संपर्क साधला. पर्यटनासाठी गेलेले कुटुंबातील तिन्ही सदस्य तिथे सुखरूप असल्याचे समल्यानंतर मेहरा परिवाराने इकडे सुटकेचा निःश्वास सोडला.