नाशिक : श्वानपालन ही काहींसाठी हौस तर, काहींसाठी गरज असू शकते. पण श्वान पाळायचा तर, त्याला केवळ खायला-प्यायला घालून उपयोग नाही, तर, त्याचं संगोपन शास्त्रीय पद्धतीने व्हायला हवे. ते कसे करायचे तेही शिकायलाच हवे. समाजाची ही गरज ओळखून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ‘श्वानपालक प्रमाणपत्र’ हा अभिनव शिक्षणक्रम सुरू केला आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुरू झालेला हा शिक्षणक्रम फक्त श्वानांच्या प्रशिक्षण, पालन-पोषण आणि संगोपनावर आधारित आहे. त्यास ऑनलाईन प्रवेश घेण्याची अंतिम मुदत ही ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे. या शिक्षणक्रमात श्वानांच्या विविध जाती: तुमच्या लाडक्या श्वानाची जात कोणती, त्याच्या गरजा काय हे समजून घेता येईल. आरोग्य आणि काळजी म्हणजे त्यांना काय खायला द्यावे, कसं ठेवावे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, हे शिकवले जाईल. वर्तन आणि प्रशिक्षणांतर्गत श्वानांना शिस्त लावणे व त्यांच्यासोबत साधण्याची तंत्रे शिकायला मिळतील. श्वानपालनाचे नियम आणि कायदेशीर बाबींबद्दलही मार्गदर्शन केले जाईल. श्वानांवर प्रेम करणाऱ्यांसाठी ही एक नवी करिअरची संधी ठरू शकते. अधिक माहितीसाठी, इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळ किंवा ०२५३ – २२३०३४० या दूरध्वनी क्रमांकावर सुटीचे दिवस वगळता संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखेच्या संचालिका डॉ. माधुरी सोनवणे यांनी केले आहे.
वैशिष्ट्ये
हा एक वर्षाचा प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे, ज्यामध्ये एकूण ४८ तात्विक तासिका आणि २४ प्रात्यक्षिके (प्रत्येकी दोन तासांची) असतील. विशेष म्हणजे, सर्व तासिका आणि प्रात्यक्षिके शनिवार-रविवार घेतली जातील, ज्यामुळे नोकरी किंवा इतर कामे करणाऱ्यांसाठीही हा शिक्षणक्रम सोयीचा ठरेल. पशुवैद्यकीय तज्ज्ञच हे वर्ग घेणार असल्याने विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळेल. शेतकरी आणि सामान्यांच्या जीवनात श्वानाचे असलेले अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन कृषिविज्ञान विद्याशाखेने श्वानपालक प्रबोधन प्रमाणपत्र शिक्षणक्रम हा नवीन शिक्षणक्रम तयार केला आहे.
रोजगाराच्या संधी…
हा शिक्षणक्रम विद्यार्थ्यांना श्वान प्रशिक्षक, श्वानपालक किंवा श्वानपालन केंद्र चालक यांच्याकडे मदतनीस म्हणून काम करण्यासाठी आणि आवड जोपासण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत करेल. यामुळे श्वानप्रेमी विद्यार्थ्यांमध्ये श्वानांप्रती दयाळूपणा, सहानुभूति आणि जबाबदारीची भावना वाढेल आणि ते समाजात एक जबाबदार नागरिक म्हणून योगदान देऊ शकतील, असे विद्यापीठाचे म्हणणे आहे. हा शिक्षणक्रम पूर्ण केल्यावर केवळ एक चांगला श्वानपालक म्हणूनच नव्हे, तर श्वान प्रशिक्षक, श्वान पोलीस, श्वान दवाखाने किंवा श्वान पालन केंद्रात सहायक म्हणून काम करण्याची संधीही मिळू शकते.