दिघा ते ठाणे प्रवासासाठी एक तास रखडपट्टी

जीवन मरणाच्या उंबरठय़ावर असलेल्या रुग्णाला त्वरित उपचार मिळावेत, म्हणून रुग्णवाहिकांसाठी वाहतुकीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत, मात्र नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या हद्दीवर सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीत रुग्णवाहिकांचीच घुसमट होत आहे. दिघा ते कळवा हा पाच मिनिटांचा रस्ता पार करण्यासाठी तब्बल एक तास लागत आहे.

कळवा येथे ठाणे महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी रुग्णालय आहे. त्यापासून काही अंतरावर सिव्हिल रुग्णालयही आहे. अपघातातील गंभीर जखमींसाठी किंवा दुर्धर आजाराने ग्रासलेल्यांसाठी ही दोन रुग्णालये मोठा आधार आहेत. भाजलेल्या रुग्णांच्या दृष्टीने ऐरोली येथील बर्न रुग्णालय महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त ठाणे आणि ऐरोली परिसरांत अनेक महत्त्वाची खासगी रुग्णालये आहेत. अत्यवस्थ स्थितीतील रुग्णाला या रुग्णालयांत नेताना वाहतूककोंडी हा मोठा अडथळा ठरत आहे.

महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर कळवा आणि ठाण्याला जोडणारा ब्रिटिशकालीन पूल बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी बांधलेला पूल हा एकमेव मार्ग आहे. कळवा नाक्यावरील कोंडी सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी रुग्णापासून ठाण्यातील साकेत मार्गापर्यंत उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रोजच या भागात वाहतूककोंडी होत आहे.

ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वेशीवरील या भागात वाहतूक पोलिसांची कमतरता आहे. प्रत्येकच वाहनचालकाला पुढे जाण्याची घाई असल्यामुळे होणाऱ्या वाहतूककोंडीत रुग्णवाहिकाही अडकून पडत आहेत आणि रुग्णांना उपचार मिळण्यास विलंब होत आहे.