माथाडींच्या बंदमुळे पाचही बाजारात शुकशुकाट, व्यापाऱ्यांचाही पाठिंबा

नवी मुंबई : राज्य शासनाकडे प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी माथाडी कामगारांनी बंद पाळला. त्याला व्यापाऱ्यांनीही पाठिंबा दिल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह संलग्न उपबाजार समित्यातील व्यवहार दिवसभर ठप्प होते. याची दखल घेत शासनाने २४ डिसेंबर रोजी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी माथाडी व व्याापरी यांनी मागील आठवडय़ात बंद पाळल्यानंतर एपीएमसीतील व्यवहार ठप्प झाले होते. त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा कामगारांनी बंद पाळला. यामुळे गेल्या काही दिवसांपासून एपीएमसीतील व्यवहार ठप्प आहेत. बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यंतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांतही हा बंद पाळण्यात आला.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या बाजार समितीत दरररोज कोटय़वधींची उलाढाल होत असते. सोमवारच्या बंदमुळे सर्वच व्यवहार, व्यवसाय ठप्प होते. भाजीपाला, कांदा-बटाटा, फळ, धान्य, मसाला असे पाच बाजार या ठिकाणी असून दररोज हजारांहून अधिक शेतमालाच्या गाडय़ांची आवक होत असते. या ठिकाणाहून मुंबई, ठाणे व उपनगरांत शेतमालाचा पुरवठा होत असतो. मात्र सोमवारी एकही गाडी बाजारात दाखल झाली नाही. पाचही बाजारांत शुकशुकाट होता. शेतमाल तुटवडा भासू नये म्हणून कामगारांनी रविवारी फळ आणि भाजीपाला बाजार सुरू ठेवला होता. भाजीपाला बाजारात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस एकूण १२०० गाडय़ांची आवक झाली होती. त्यामुळे भाजीपाला पुरवठय़ावर कोणताही परिणाम जाणवला नाही. फळ बाजारात ३० गाडय़ांची सोमवारी आवक होती, मात्र बाजार बंद असल्याने एकाही गाडीतील माल उतरवला गेला नाही. पाचही बाजारांचे मुख्य प्रवेश द्वारही बंदच ठेवण्यात आले होते. त्यामुळे नेहमीच गजबजलेल्या बाजार परिसरात सोमवारी शुकशुकाट होता. बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कामगारांच्या मागण्या

* राज्यातील माथाडी बोर्डावर, सल्लागार समितीवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

* कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश

* कामगारांना विमा सुरक्षा, करोनाची बाधा होऊन मृत्यू झालेल्यांना शासनाकडून आर्थिक साहाय्य

* रेल्वे प्रवासासाठी पास व तिकीट

* कामगारांवर गुंडगिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त

* कामगारांच्या मुलांना बोर्डात नोकरी

तीव्र आंदोलनाचा इशारा

एपीएमसीमध्ये दिवसभर बंद टेवल्यानंतर माथाडी भवन येथे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी कामगारांची जाहीर सभा घेतली. यात राज्य सरकारने २४ डिसेंबरला आपल्या मागण्यांबाबत बैठक आयोजित केली असल्याचे कळविले आहे. त्यामुळे तूर्तास हे आंदोलन मागे घेत आहोत. या बैठकीत महाराष्ट्र शासनाच्या कामगार, पणन, गृह, महसूल, नगरविकास व अन्य विभागांकडे प्रलंबित असलेल्या कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच तीव्र आदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. माथाडी कामगारांच्या तीव्र आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामास सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, असा इशाराही नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.

एपीएमसी बाजारातील बंदने शेतमालाची आवक घटत असून आर्थिक उलाढालीवर परिणाम होतो. धान्य बाजारात आवक झाली असून गाडय़ा मात्र बाजार आवारात उभ्या आहेत. मात्र सर्व व्यवहार ठप्प होते.

-अनिल चव्हाण, सचिव, एपीएमसी

सोमवारी बंद होणार असल्याने रविवारी बाजार सुरू ठेवण्यात आला होता. शनिवारी आणि रविवारी मुंबई उपनगरात भाजीपाल्याचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे आजच्या बंदने तितका परिणाम झाला नाही.

-शंकर पिंगळे, संचालक, भाजीपाला बाजार समिती