विकास महाडिक

नवीन धरण स्रोत शोधण्याची तयारी; पनवेलची टंचाई मिटविण्यासाठी मदत

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रातील (नैना) नागरिकांना भविष्यात लागणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी सिडको नवीन धरणाचे स्रोत निर्माण करणार आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्य़ात बंद पडलेले जलसिंचनाचे प्रकल्प तसेच नवीन धरण स्रोत शोधण्याची तयारी सिडकोने सुरू केली आहे.

यापूर्वी सिडकोने हेटवणे, बाळगंगा आणि कोंढाणे धरणांना राज्य शासनाच्या आदेशाने वित्तपुरवठा केलेला आहे पण या धरणाचे पाणी सिडको क्षेत्राला पुरेसे मिळत नाही. त्यामुळे मुंबई तसेच नवी मुंबई पालिकेप्रमाणे एक स्वतंत्र धरण बांधण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. या धरणाचा पनवेल पालिकेतील पाणीटंचाई दूर करण्यास मोठा हातभार लागणार आहे.

दोन वर्षांनंतर सिडको स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. राज्यातील दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोल्फ कोर्स, प्रदर्शन केंद्र, सेंट्रल पार्क, अद्ययावत रेल्वे स्थानके उभारणाऱ्या सिडकोला अद्याप पिण्याच्या पाण्याचे स्वतंत्र स्रोत निर्माण करता आलेले नाही. एमआयडीसी, जलसिंचन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाणीपुरवठय़ावर सिडको आपल्या दक्षिण नवी मुंबईतील नागरिकांची तहान भागवीत आहे. महामुंबई क्षेत्राची वाढती लोकसंख्या पाहता सिडकोने काही वर्षांपूर्वी पेणमधील हेटवणे धरणाला दोनशे कोटी रुपयांचे अनुदान देऊन त्या धरणातील पाणीपुरवठा विकत घेतला आहे. सध्या हा पाणीपुरवठा कामोठे, खारघर, द्रोणागिरी या सिडको नोडला केला जात आहे. या धरणाची क्षमता वाढविण्याचे काम सुरू असून नवी मुंबई पालिकेने आपल्या वाढत्या लोकसंख्येला या पाण्यावर हक्क सांगितला आहे. जलसिंचन घोटाळ्यात अडकलेला पेणमधील दुसरे बाळंगगा धरणालाही सिडकोने सुमारे एक हजार २०० कोटी रुपयांची वित्तपुरवठा केलेला आहे. या धरणातील पाणी पनवेल आणि नैना क्षेत्राला मिळेल असे अपेक्षित होते पण हे धरण आता घोटाळ्यात गटांगळ्या खात आहे. सिडकोच्या नैना क्षेत्राला भविष्यात पाचशे ते सहाशे  दशलक्ष लिटर पाणी लागणार असल्याने सिडकोने कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरणाच्या उभारणीसाठी दोन वर्षांपूर्वी चारशे कोटी रुपये दिलेले आहेत पण या ठिकाणच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे एका वर्षांत एक लाखापेक्षा जास्त घरे बांधण्याचा संकल्प सोडलेल्या सिडकोला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे क्रमप्राप्त झाले आहे.

केवळ सिमेंटचे जंगल उभे करणाऱ्या सिडकोने पिण्याचे पाणी हा मुद्दा दुर्लक्षित केलेला आहे. पुढील वर्षी पहिले उड्डाण होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही मोठय़ा प्रमाणात पाणी लागणार आहे. नैना क्षेत्रात २०२२ पर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त घरे तयार होण्याची शक्यता आहे. या सर्व लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणार आहे. पनवेल पालिका क्षेत्रात या समस्येने जानेवारी महिन्यातच डोके वर काढले असून २००पेक्षा जास्त टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

प्रकल्प हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव

सिडकोच्या या महामुंबई क्षेत्रातील पाणी समस्या कायमची सोडविण्यासाठी सिडको रायगड जिल्ह्य़ात पाण्याचे स्रोत शोधत आहे. त्यासाठी एका सल्लागार कंपनीला काम दिले जाणार असून जलसिंचन विभागाने सर्वेक्षण केलेले अथवा निधीअभावी अर्धवट सोडलेले धरण प्रकल्प हस्तांतरित करण्याचा सिडकोचा प्रस्ताव आहे. सिडकोला निधीची कमतरता नसल्याने स्वतंत्र धरण बांधण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

पाण्याचे स्रोत निर्माण करण्याची जबाबदारी राज्य शासनाने जलसिंचन विभागावर सोपवली असल्याने सिडकोने इतक्या वर्षांत या स्वतंत्र स्रोताकडे लक्ष दिले नाही पण महामुंबई क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि प्रकल्प पाहता सिडको नवीन पाणी स्रोताचा लवकरच शोध घेईल. त्यासाठी निधीअभावी अर्धवट पडलेल्या धरणांचाही पर्याय खुला आहे.

लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको