राज्यातही पुन्हा आमचीच सत्ता : मुख्यमंत्री

नवी मुंबई मतदारांनी आघाडीची मक्तेदारी मोडीत काढली आहे. त्यामुळे केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही पुन्हा आमचीच सत्ता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नवी मुंबई येथील कार्यक्रमात व्यक्त केला.

श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने सीवूड्स येथे गणपत शेठ तांडेल मैदानात आयोजित केलेल्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या कार्यअहवालाच्या प्रकाशन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. विधानसभा निवडणुकीतही शिवसेना-भाजप युतीची सरशी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला डॉ. डी. वाय. पाटील, आमदार मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, रमेशदादा पाटील, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे शिवसेनेचे विजय चौगुले, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी आदी उपस्थित होते.

रामभाऊ  म्हाळगी यांनी एक परंपरा सुरू केली. लोकप्रतिनिधीने मतदारांचे उत्तरदायित्व निभावले पाहिजे. ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिले त्यांच्यासमोर आपला अहवाल लोकप्रतिनिधीने पोहोचवला  पाहिजे. जे लोकांचे आहे ते त्यांना मिळाले पाहिजे या भूमिकेतून स्थानिकांचे, भूमिपुत्रांचे, गरजेपोटी वाढवलेल्या घरांचे, गावठाण विस्ताराचे आणि पुनर्विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.  नवी मुंबईतीलउर्वरित कामेही तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

वाशी खाडीमध्ये अनेकांचे जीव वाचवणाऱ्या महेश सुतार यांचा आणि गायक संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन यांचा या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दुष्काळग्रस्तांसाठी आलोय!

नवी मुंबईतील नागरिकांनी लोकांचे अनेक प्रश्न सोडवण्यास हातभार लावला आहे. आपण दुष्काळी भागातील नागरिकांनाही मदत करणार आहात, या अपेक्षेने मी नवी मुंबईत आलोय, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त करताच आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ११ लाखांचा धनादेश सुपूर्द केला.