News Flash

नाटय़गृह खुली मात्र प्रयोग अशक्य!

कोविड-१९ संसर्गामुळे महाराष्ट्रात टाळेबंदी लागू झाल्याने नाटय़गृहे बंद करण्यात आली होती.

राज्यातील सर्व नाटय़गृहे एकाच वेळी सुरू करण्याची नाटय़निर्मात्यांची मागणी

पूनम सकपाळ

नवी मुंबई : कोविड-१९ संसर्गामुळे महाराष्ट्रात टाळेबंदी लागू झाल्याने नाटय़गृहे बंद करण्यात आली होती. पुन्हा जूनमध्ये नाटय़गृहे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याला परवानगी देण्यात आलेली आहे. दुसऱ्या लाटेत आता नाटय़रसिक आणि नाटय़निर्माते कसा प्रतिसाद देत आहेत, हे आगामी कालावधीत स्पष्ट होईल. मात्र यावर नाटय़निर्माते खूश नसून राज्यातील सर्व नाटय़गृहे एकाच वेळेस सुरू केली तरच नाटकांचे प्रयोग करणे शक्य होईल, असे मत व्यक्त केले आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेत टाळेबंदीमध्ये शिथिलता दिल्यानंतर नोव्हेंबरमध्ये नाटय़गृहांना परवानगी देण्यात आली होती. मात्र ५० टक्के आसनक्षमता असल्याने नाटकांना प्रतिसाद नव्हता. त्यामुळे पुन्हा नाटय़ निर्मात्यांना नाटय़गृह बुकिंगवर ७५ टक्के सूट देण्यात आली होती. डिसेंबर २०२० मध्ये नाटय़प्रयोगांना सुरुवात करण्यात आली. त्यांनतर पुन्हा मार्च महिन्यात करोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली. करोनाची दुसरी लाट येताच पुन्हा टाळेबंदी जाहीर केली. आता पुन्हा निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यानुसार ठाणे जिल्ह्यत आणि नवी मुंबई शहरात रुग्ण कमी झाले आहेत. त्यामुळे येथील नाटय़गृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावर नाटय़निर्मात्यांनी राज्यातील नाटय़गृहे एकाच वेळी सुरू झाली तरच नाटकांचे प्रयोग करणे शक्य होणार आहे. आता ५० टक्के आसनक्षमतेने सुरू न करता १०० टक्के क्षमतेची गरज आहे. आधीच नाटकांना नाटय़रसिकांची दाद कमी झाली आहे त्यात ५० टक्के आसनक्षमतेने आणखी कमी होत आहे. एकूण ७५० नाटय़ कर्मचारी आहेत, मागील वेळी फक्त १०० नाटय़कर्मीच्या हाताला काम मिळाले होते. उर्वरित ६५० कामगार वाऱ्यावर होते. त्यामुळे या वेळी शंभर टक्के क्षमतेने काम सुरू होणे गरजेचे आहे.  एकाच नाटय़गृहात प्रयोग करणे शक्य नाही. प्रयोग कुठे होणार, त्याची जाहिरातही आधी केली जाते. मात्र त्याचदरम्यान तो पाचव्या झोनमध्ये गेला तर ऐनवेळी प्रयोग रद्द होतील. त्यामुळे सर्व नाटय़निर्माते हे सर्व नाटय़गृहे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

करोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानुसार त्या त्या ठिकाणी नाटय़गृहे सुरू  करण्यास परवानगी दिली जात आहे. ठाण्यामध्ये परवानगी असून केवळ एक ते दोन नाटय़गृहांत नाटकांचे प्रयोग करणे हेही ५० टक्के आसनक्षमतेने शक्य नाही. महाराष्ट्रात मराठी संस्कृतीत नाटकांना महत्त्वाचे स्थान असूनदेखील अद्याप शासन मदत जाहीर करत नाही. त्यामुळे आता १०० टक्के आसन आणि राज्यात सर्वत्र नाटय़गृह सुरू झाले. तरच नाटक प्रयोग करण्यात येतील, त्यामुळे सर्व नाटय़गृहे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

– रत्नकांत जगताप, कार्यकारी निर्माता, रंगमंच कामगार संघ

विष्णुदास भावे नाटय़गृहाच्या उत्पन्नात घट

विष्णुदास भावे नाटय़गृहाचीदेखील पुन्हा तिसरी घंटा वाजणार आहे. मात्र नाटय़गृहाला परवानगी दिली असली तरी नाटय़गृहाला नाटकांच्या प्रयोगांना कसा प्रतिसाद मिळतो हे येणाऱ्या कालावधीतच स्पष्ट होणार आहे. करोनाकाळात भावे नाटय़गृहाच्या आर्थिक उत्पन्नात घट झाली आहे. दरवर्षी १ कोटी उत्पन्न होण्यास कात्री बसली असून एप्रिल २०२०-मार्च २०२१ पर्यंत अवघे १० लाख उत्पन्न मिळाले आहे. नाटय़गृहात ६३ नाटकांचे प्रयोग झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 2:42 am

Web Title: demand playwrights start theaters state ssh 93
Next Stories
1 महापालिकेच्या कामगारांचे आंदोलन
2 मनुष्यबळाअभावी आरोग्य केंद्रात गैरसाय
3 मौजमस्तीसाठी दुचाकी, मोबाइल चोरी
Just Now!
X