विद्युत वाहनांसाठी महापालिकेचा पुढाकार

विकास महाडिक, लोकसत्ता

नवी मुंबई : भविष्याची गरज ओळखून नवी मुंबई पालिकेने शहरात मोक्याच्या ठिकाणी ‘बांधा, वापरा हस्तांतरण करा’ तत्त्वावर ३६ विद्युत वाहन चार्जिग केंदे उभारणार आहे. त्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झाली असून काही संस्था पर्यावरणयुक्त केंद्रे उभारण्यास उत्सुक आहेत. पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या पाचशे बस व प्रशासनाची सर्व वाहने ही येत्या काळात बॅटरीवर चालणारी घेतली जाणार असून शून्य प्रदूषणाचे लक्ष पालिका क्षेत्रात ठेवण्यात आले आहे. विद्युत वाहनांसाठी चार्जिग केंद्र उभारणारी पालिका ही देशातील दुसरी पालिका ठरणार आहे.

पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र शासनाने बॅटरीवर चालणाऱ्या विद्युत वाहनांसाठी धोरण तयार केले असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गावर २५ किलोमीटर अंतराच्या परिसरात विद्युत चार्जिग केंद्र उभी करण्याचा संकल्प सोडला आहे. गेली अनेक वर्षे नवी मुंबई पालिका दरवर्षी जुलै महिन्यात पर्यावरण अहवाल सादर करण्याइतपतच पर्यावरणाची काळजी वाहत असल्याचे दिसून आले आहे. यंदा पर्यावरणाला अधिक महत्त्व देताना अर्थसंकल्पात पर्यावरण पूरक तरतूद करण्यात आली आहे. प्रदूषणाचा महत्त्वाचा घटक वाहन असून वाहनांचे प्रदूषण हे सर्वाधिक मानले गेले आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिकेने आपल्या परिवहन उपक्रमातील पाचशेच्या वर असलेली वाहने ही सीएनजीमध्ये परावर्तित केली असून यानंतर विकत घेण्यात येणारी वाहने ही बॅटरीवर चालणारी घ्यावी असा निर्णय घेतला आहे. ‘एनएमएमटी’मध्ये १९९५ मध्ये घेतलेली काही वाहने आता कालबाह्य़ झाली असून पालिकेने त्यातील काही विद्युत व सीएनजी इंधनावर चालणारी घेतली आहेत. याच प्रकारे पालिका प्रशासनाच्या विविध विभागासाठी घेण्यात आलेली दोनशे वाहने ही देखील आता कालबाह्य़ झाली असून नव्याने घेण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये विद्युत वाहनांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ही वाहने सर्वसाधारणे पेट्रोल, डिझेल वाहनांपेक्षा थोडी महाग आहेत पण वार्षिक देखभाल आणि दुरुस्तीच्या दृष्टीने पाहिल्यास विद्युत वाहने ही पेट्रोल, डिझेल वाहनांपेक्षा जास्त चांगली असून कमी देखभाल दुरुस्ती खर्च देणारी आहेत. पालिकेच्या स्वमालकीच्या वाहनांबरोबरच साठ वाहने ही वार्षिक ठेका पद्धतीने घेतली गेली आहेत. यानंतरची वाहने बॅटरीवर चालणारी विद्युत वाहने घ्यावीत असा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. विद्युत वाहने घेण्याचा प्रस्ताव पालिका तयार करीत असली तरी या वाहनांना चार्जिग स्टेशनची मोठी अडचण येणार आहे. त्यासाठी भविष्याची गरज आणि प्रदूषणावर उपाय म्हणून पालिका शहरातील मोक्याच्या ठिकाणी चार्जिग स्टेशन उभारण्यास प्रोत्साहन देणार आहे. यासाठी पालिका केवळ जागा देणार असून केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानावर ही स्टेशन उभी राहणार आहेत.

यासाठी पालिकेचा एक रुपया देखील खर्च होणार नाही. त्यामुळे ही स्टेशन उभारण्यासाठी लवकरच निविदा मागविल्या जाणार आहेत. विद्युत वाहनांसाठी बॅटरी चार्जिगसाठी ही स्टेशन उपयोगात येणार आहेत. मुंबईत मंत्रालयात अशा प्रकारचे एक स्टेशन उभारण्यात आले आहे.

विद्युत इंधनावर धावणाऱ्या वाहनाची क्षमता पाचशे किलोमीटर अंतर आहे. देशातील एक वाहन कंपनी ही क्षमता २५० किलोमीटर अंतरापर्यंत करीत आहे. त्यामुळे एमएमआरडी क्षेत्रात एक फेरी मारण्यासाठी विद्युत वाहने या २५० किलोमीटर अंतरासाठी पुरेशी ठरणार आहेत. अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करणारी नवी मुंबई पालिका ही देशातील एकमेव पालिका आहे.

निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू

परिवहन उपक्रमाच्या पाचशे बस व प्रशासनाची सर्व वाहने ही येत्या काळात बॅटरीवर चालणारी घेतली जाणार

पर्यावरणाचा विचार करणे ही आता काळाची गरज झाली आहे. त्यादृष्टीने पालिकेने पर्यावरणाला महत्त्व देणारी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असून विद्युत वाहनांसाठी चार्जिग केंद्र ही संकल्पना प्रत्यक्षात आणली जाणार आहे. त्यासाठी शहरातील ३६ ठिकाणे निश्चित केली जाणार आहेत. पालिकेचा यात आर्थिक सहभाग नाही, मात्र काळाची पावले ओळखून ही तरतूद आजच करणे योग्य ठरणार आहे.

अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई पािलका