सिडकोच्या सानपाडा येथील दीड एकर भूखंडासाठी १६६ कोटींचा देकार

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : बांधकाम व्यवसायात आर्थिक मंदीचे वारे घोंघावत असताना सिडकोच्या महामुंंबई क्षेत्रातील भूखंडांना चांगली मागणी येत असून सानपाडा येथील एका दीड एकर भूखंडासाठी गोदरेज समूहाच्या बांधकाम कंपनीने १६६ कोटींचा देकार दिला आहे. ही बांधकाम कंपनी या ठिकाणी चार लाख चौरस फुट क्षेत्रफळाची घरे बांधत असून नवी मुंबईसारख्या मुख्य शहरात एका नामांकित बांधकाम कंपनीने प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी पनवेलबाहेर मुंबईतील काही बडय़ा विकासकांनी मोठे गृहप्रकल्प उभारले आहेत. सिडकोने मोकळे भूखंड विकून टाकण्याचा सपाटा सुरू केला आहे.

मुंबईत जमिनीचा तुटवडा जाणवू लागल्याने विकासकांनी नवी मुंबईत मोर्चा वळविला होता. नव्वदच्या दशकात सिडको या विकासकांना लाल पायघडय़ा घालताना भूखंड विक्री करीत होती. त्यामुळे शहरांचे शिल्पकार असलेल्या सिडकोचे गृहनिर्मितीकडे दुर्लक्ष झाल्याने ५० वर्षांत केवळ एक लाख ३० हजार घरांची निर्मिती सिडकोकडून झाली आहे. त्यामुळे २१व्या शतकात सिडकोचे विकासकधार्जिणे धोरण असल्याचा आरोप केला जात होता. केंद्र सरकारच्या सर्वासाठी घरे या योजनेची सर्वाधिक अमंलबजावणी करण्याची जबाबदारी भाजपा काळात सिडकोवर आल्याने सिडकोने दोन लाख घरे बांधण्याची केवळ घोषणा केली आहे. आता ही संख्या कमी झाली असून सिडको सध्या ६५ हजार घरे बांधणार आहे. त्यामुळे ५० वर्षांत सिडकोने दोन लाख घरे बांधली असे दिसून येते. याउलट खासगी विकासकांनी सिडकोच्या पाच पट घरे बांधलेली आहेत. सिडकोच्या तिजोरीत पुन्हा खडखडाट जाणवू लागला असून यापूर्वी भूखंड विक्रीतून सिडकोने कोटय़वधी रुपये जमा केले होते. सिडकोला पुन्हा अच्छे दिन आणण्यासाठी महामुंबई क्षेत्रातील भूखंड विक्रीची क्लृप्ती पुन्हा स्विकारण्यात आली असून मोकळ्या भूखंडांवर अतिक्रमण होण्यापेक्षा ते विकून टाकण्याचे धोरण अंवलबिण्यात आले आहे. त्यासाठी सिडको नुकतेच छोठे मोठो १०६ भूखंड विक्रीस काढले असून त्यांना चांगला प्रतिसाद लाभला आहे.

सानपाडा क्षेत्रातील दीड एकरचे भूखंड विक्रीस काढल्यानंतर बांधकाम क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या गोदरेज प्रॉपट्रीज लिमिटेड या बांधकाम कंपनीने १६६ कोटींचे भूखंड खरेदी केले आहेत. या बांधकाम कंपनीने बंगळुरु येथे अलीकडे १८ एकरची जमिन खरेदी केली आहे. त्यानंतर एमएमआरडीए क्षेत्रातील ही दुसरी मोठी खरेदी आहे.

या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गृहनिर्मिती होणार आहे. सानपाडा येथील या मोठय़ा भूखंड विक्रीनंतर सिडको ऐरोली येथील आंतरराष्ट्रीय राजदूत केंद्रातील ३४ हेक्टर जमिनीचे भूखंड विक्रीस काढणार आहे.