भगवान मंडलिक/जयेश सामंत

राजकीय समीकरण बदलल्यास प्रतिकूल परिणामांची भीती

कल्याण, पालघर लोकसभा मतदारसंघांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मतांचा जोगवा मागणाऱ्या शिवसेना नेत्यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे शिवसैनिकांच्या मनात धडकी भरली आहे. विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरण बदलले तर पक्षाचे अस्तित्व धोक्यात येईल, अशी भीती पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होऊ लागली आहे.

मतदानादरम्यान अनेक ठिकाणी मतदारांनी कमळाच्या चिन्हाची निवडणूक अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्याचे किस्से घडले आहेत. मोदी नामाचा जप सुरू असताना शिवसेनेच्या प्रतिमेचे काय, असा सवाल आता दबक्या आवाजात विचारला जात आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण हा परिसर वर्षांनुवर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी मोठय़ा चलाखीने भाजपच्या ताब्यात असलेला पूर्वीचा ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आणला. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात वर्षांनुवर्षे भाजपला दुय्यम स्थानी राहणे भाग पडले. कोणत्याही निवडणुका असोत, जाहीर-प्रचार सभा आणि कार्यक्रमांमध्ये शिवसेनेचा झंझावात असे. निवडणुकांच्या काळात शिवसैनिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरत आणि घराघरांतून मतदारांना बाहेर काढत.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील तुरळक अपवाद वगळले तर ठाणे लोकसभा मतदारसंघात यंदा हे चित्र अपवादानेच दिसले. राज्य आणि केंद्रात सत्तेत असतानाही शिवसेनेने विरोधी पक्षाची भूमिका वठवली. ठाणे, कल्याण डोंबिवलीसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकमेकांविरोधात लढविल्या. या निवडणुकांमध्ये भाजपकडून राज्यातील सत्तेचा पुरेपूर वापर केला गेल्याच्या तक्रारी असतानाही ठाणे, डोंबिवलीत शिवसेनेने सत्ता मिळविली. मजबूत संघटनेमुळे हे शक्य झाले असले तरी लोकसभा निवडणुकीत वरिष्ठ नेते भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गाताना दिसल्याने शिवसैनिकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. मतदानाच्या दिवशीही शिवसेनेपेक्षा भाजप आणि संघाची फळी अधिक आक्रमक दिसून आल्याने शिवसेनेच्या गोटात सध्या याचीच चर्चा सुरू असल्याचे दिसते.

मोदींचे नाव पुरेसे असल्याची भावना

ठाणे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे युती होताच निर्धास्त झाल्याचे दिसले. ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदरमध्ये पक्षाकडून पुरेशी रसदही कार्यकर्त्यांना पुरवली गेली नाही. ठाण्यात संघटना मजबूत असतानाही ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेपेक्षा भाजप आणि संघाचे कार्यकर्तेच झोकून देऊन काम करताना दिसले.

घोडबंदर तसेच कल्याण पूर्वेत शिवसेनेचा वरचष्मा असूनही मतदानाच्या चिठ्ठय़ादेखील वाटल्या गेल्या नसल्याच्या तक्रारी आता पुढे येत आहेत. मोदी नामाचा जप पुरेसा आहे, अशी नेत्यांची भूमिका असल्याने येत्या काही महिन्यांत राजकीय समीकरणे बदलली तर पक्षाला प्रचार करताना घाम फुटेल, अशी भीती आता शिवसेनेचे काही पदाधिकारी व्यक्त करू लागले आहेत.

कल्याणमधील शाखा थंडावल्या

  • कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शाखांत पूर्वी सत्यप्रत म्हणून विशेष कार्य अधिकाऱ्याचा शिक्का नक्कल प्रतीवर मारून देणे, मालक भाडेकरूतील वाद सोडवणे, पोलीस ठाण्यातील कामांसाठी साहाय्य, शाळा प्रवेश असे अनेक उपक्रम निष्ठावान शिवसैनिक एक जबाबदारी म्हणून करत. मात्र, कल्याण-डोंबिवलीतील बहुतेक शाखांना टाळे लागल्याची खंत शिवसैनिकांना आहे.
  • काही ठिकाणी तर मनसेचे फलक शाखेसमोर लावण्यात आले आहेत. शाखा भाडय़ाने देण्याचा उद्योग डोंबिवली पश्चिमेत झाला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का घटण्याचे कारण नवा आणि जुना निष्ठावान शिवसैनिकांमधील नेत्यांकडून केला जाणारा दुजाभाव हाही आहे, असे नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर एका शिवसैनिकाने सांगितले.
  • याविषयी शिवसेनेच्या काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी या विषयावर उघडपणे बोलण्यास नकार दिला. पण नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्यांनी ‘आमचे संघटनात्मक कार्य व्यवस्थित सुरू आहे. जुने, नवे असे सर्व शिवसैनिक वेळ आल्यावर एकत्र कामाला लागतात. ही शिवसेनाप्रमुखांची संघटना असल्याने ती अभेद्य आहे,’ असे सांगितले.