मुंबई हल्ल्यानंतर उभारलेले बंकर गायब

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रेल्वे स्थानकांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांवर पाहणी केली असता, येथील सुरक्षा ‘रामभरोसे’ असल्याचे चित्र आहे. धातूशोधक यंत्रे आणि सामान तपासणी यंत्रणाच नाही. तर मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर उभारण्यात आलेले बंकर गायब असून जिथे आहेत, तेथे कुत्र्यांचा रहिवास पहावयास मिळाला.

रेल्वे सुरक्षा बल (आरएसपी) आणि रेल्वे पोलिसांचीही गस्त नियमितपणे होत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

नवी मुंबई शहरातील सिडकोने भव्य रेल्वेस्थानकांची निर्मिती केली. यातून दररोज हजारो रेल्वेप्रवाशी प्रवास करत आहेत, मात्र त्यांची सुरक्षा बेदखल दिसून येत आहे. वाशी ते पनवेल या हार्बर मार्गावर व वाशी ते ठाणे या ट्रान्स हार्बर मार्गावर एकाही रेल्वेस्थानकावर धातूशोधक यंत्रे नाही. सामान तपासणी यंत्राचा तर पत्ताच नाही. त्यामुळे कोणीही, कधीही प्रवेश करू शकते. रेल्वे सुरक्षाबल व रेल्वे पोलिसांची गस्तही तुटपुंजी आहे.

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हार्बर मार्गावरील प्रत्येक स्थानकावर वाळूची पोती रचून बंकर बनवण्यात आले होते. ते सगळे बंकर पान खाऊन धुकण्याच्या पिकदाण्या बनल्या होत्या. त्यामुळे ते बंकरच काढून टाकण्यात आले आहेत. वाशी स्थानकाच्या प्रवेशद्वारावर दोन बंकर आहेत, पण ते कुत्र्यांना झोपण्याचे ठिकाण बनले आहे.

घातपात झाल्यानंतर यंत्रणा उभी करण्यापेक्षा आधीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. स्थानकात प्रवेशासाठी कसलीही तपासणी होत नसल्याचे महेश काळे या रेल्वे प्रवाशाने सांगितले.

आरपीएफकडून तपासणी

रेल्वे स्थनकांवर पोलिसांची व आरपीएफची गस्त ही नावापुरतीच दिसून येते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्थानकांची तपासणी सुरू केली आहे. गुरुवारी कोपरखैरणे व नेरुळ स्थानकाची आरपीएफकडून तपासणी करण्यात आली. तसेच घातपात विरोधी तपासणी सुरू असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौरीप्रसाद हिरेमठ यांनी लोकसत्ताला दिली.

मुंबई, नवी मुंबईमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्या पाश्र्वभूमीवर सर्वच रेल्वेस्थानकावर खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षा यंत्रणा सतर्क केली आहे. आकडेवारी सांगता येणार नाही, परंतु चोख व्यवस्था आहे.

– सुनील उदासी, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

शहरात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली असून रेल्वेस्थानक परिसरातही नाकाबंदी व गोपनीय यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. रेल्वेस्थानक परिसरासाठी क्यूआरटी यंत्रणाही ठेवण्यात आली आहे.

-डॉ.सुधाकर पाठारे, उपायुक्त परिमंडळ- १.