संतोष जाधव
दिवसाला ४० वाहनांची तपासणी; मुंबईतील हलकी वाहनेही नवी मुंबईत
नेरुळ सेक्टर १९ ए येथे वाहन तपासणी केंद्रात आलेली वाहने रहिवासी क्षेत्रात उभी करण्यास विरोध झाल्यानंतर आता त्यांचा भार नेरुळ एमआयडीसाीतील रस्त्यांवर दिसत आहे. या भागात दुतर्फा या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.
नेरुळ वंडर्स पार्कसमोरील भूखंडावर गेल्या वर्षीपासून वाहन तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. याला विरोध करीत न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. ब्रेक टेस्टिंगसाठी येणाऱ्या जड, अवजड वाहनांचा वावर वाढला असल्याने याचा त्रास होत आहे. याला विरोध झाल्यानंतर आता ही वाहने आरटीओने एमआयडीसी क्षेत्रात उभ्या करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच रिक्षाचालकांना मात्र ऑनलाइन प्रक्रियेद्वारे नंबर मिळाल्यानंतर या ठिकाणी दोन-तीन दिवस रांगा लावून ताटकळत बसावे लागत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले.
ज्या ठिकाणी वाहन तपासणी केंद्राला जागा उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी इतर केंद्रातील वाहने पासिंग करण्यात यावी, असे परिवहन आयुक्तांनी निर्देश दिल्यानंतर मुंबई सेन्ट्रल व वडाळा आरटीओ क्षेत्रांतील हलकी वाहनेही या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा या वाहनांच्या रांगा लागत असून त्यामुळे एमआयडीसी क्षेत्रातही वाहतूक कोंडी होत आहे.
ऑनलाइनद्वारे पासिंगसाठी दिवस ठरल्यानंतर आम्ही एमआयडीसी क्षेत्रात वाहन घेऊ न येतो. परंतु भल्यामोठय़ा रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा टोकन मिळते. रस्त्यावरच दोन दिवस गाडीतच झोपावे लागते. पासिंगसाठी ६०० रुपये लागतात. पण प्रत्यक्ष मात्र तीन पट पैसे खर्च होतात.
– सुरेश गुप्ता, रिक्षाचालक
नवी मुंबईबरोबरच मुंबई सेन्ट्रल तसेच वडाळा येथील हलकी वाहने नवी मुंबईत तपासणीसाठी येतात. त्यामुळे अधिक ताण पडतो. एमआयडीसी येथे वाहने उभी करून चलन देऊ न टप्प्याटप्प्याने वाहने नेरुळ तपासणी केंद्रात आणली जातात.
– आर. सावंत, साहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी,नवी मुंबई
दिवसाला फक्त ४० वाहनांची चाचणी
वाहनांच्या पासिंगसाठीची ऑनलाइन प्रक्रिया वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहे. ऑनलाइन नंबर मिळाल्यानंतर या ठिकाणी वाहने आल्यानंतर रांगेत उभे रहावे लागते. दिवसाला फक्त ४० वाहनांचे पासिंग केले जाते, रांगेत मात्र हजारो वाहने असतात. त्यामुळे ही प्रक्रिया सुलभ केली तर वाहनचालकांना सोयीचे होईल व आरटीओवरही ताण पडणार नाही, असे महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष दिलीप आमले यांनी सांगितले.