ऐन निवडणूक काळात मालमत्तेचा वाद ऐरणीवर?
नवी मुंबई : वाशी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या नूतनीकरण सोहळ्यावरून सध्या वाद सुरू आहे, मात्र हे कार्यालय भाजपचे आमदार गणेश नाईक व दिवंगत विभागप्रमुख बुधाजी भोईर यांच्या नावावर असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे नाईक शिवसेनेला जेरीस आणण्यासाठी या मालमत्तेचा वाद ऐरणीवर आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चाळीस वर्षांपूर्वी वाशी येथील शिवसैनिकांनी हे कार्यालय वर्गणी काढून विकत घेतले असल्याचे स्पष्टीकरण यापूर्वी पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.
वाशी सेक्टर १६ मधील रेश्मा गृहनिर्माण सोसायटीतील पहिल्या मजल्यावरील एका सदनिकेत शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय आहे. या कार्यालयाची अलीकडे दुर्दशा झाली होती. त्यामुळे येथील पदाधिकाऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून या कार्यालयाचे नूतनीकरण केले आहे. चकाचक करण्यात आलेल्या या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा व रक्तदान शिबीर ३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकांवर उपनेते विजय नाहटा आणि माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचे नाव न छापण्यात आल्याने त्यांच्या सर्मथक शिवसैनिकांनी समाजमाध्यमावर गोंधळ घातला. त्यासाठी बहिष्कार आणि आंदोलनाची धमकी देण्यात आली. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला नागपूर दौऱ्याचे कारण देऊन हजेरी लावण्याचे टाळले. त्यामुळे सभागृह आणि बैठक खोलीसह, संगणक कक्षाची व्यवस्था करण्यात आलेल्या या कार्यालयाचे उदघाटन अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडले आहे. अनेक वेळा वादग्रस्त ठरलेले हे कार्यालय तत्कालीन शिवसेनेचे जिल्हा नेते गणेश नाईक व तत्कालीन शाखाप्रमुख (नंतर ते विभागप्रमुख झाले) दिवंगत बुधाजी भोईर यांच्या नावे आहे. मुंबईहून आलेल्या शिवसैनिकांची पहिली शाखा वाशी सेक्टर नऊमधील पुष्पकांत पाटील यांच्या घरी भरत होती. त्यानंतर वर्गणी गोळा करून हे कार्यालय विकत घेण्यात आल्याचे येथील एका पदाधिकाऱ्याने सांगितले. विकत घेण्यात आलेली सदनिका ही शिवसेनेच्या नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे नसल्याने ती तात्कालीन नेते गणेश नाईक व स्थानिक शाखाप्रमुख बुधाजी भोईर यांच्या नावे करण्यात आलेली आहेत. त्या वेळी वाशी आणि आजूबाजूच्या भागांत मोठय़ा प्रमाणात बांधकामे सुरू होती. त्यामुळे शिवसैनिकांना वर्गणी मिळणे सोपे गेल्याने शिवसेनेच्या नावावर पहिले कार्यालय होऊ शकले. या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आल्याने शिवसैनिकांचे या कार्यालयाबरोबर एक नाते जुळलेले असल्याच्या आठवणी शिवसैनिक सांगत आहेत. गेले काही महिने दुर्लक्षित पडलेले या कार्यालयाने पुन्हा नव्याने कात टाकली असून त्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उफाळलेल्या वादावर जुन्या शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक पातळीवर शिवसेनेला जेरीस आणण्यासाठी नाईक सर्मथक या मालमत्तेच्या ताब्यावरून पुन्हा वाद निर्माण करण्याची शक्यता आहे. यापूर्वी हा वाद वाशी पोलीस ठाण्यापर्यंत गेला होता.