नवी मुंबई : पुण्यातील एका गरजूला रेमडेसिविर इंजेक्शन देतो असे सांगून त्याला इंजेक्शन न देता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. चार इंजेक्शनसाठी आरोपींनी फिर्यादीकडून ८८ हजारांची रक्कम घेतली होती. आरोपी तिघेही मित्र आहेत.

पुणे येथे करोनावर उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला तीन रेमडेसिविर इंजेक्शनची गरज होती. पुण्यात ती मिळत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांच्या शोध सुरू होता. पनवेल येथील आकाश म्हात्रे याच्याकडे इंजेक्शन असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी म्हात्रे याचा संपर्क क्रमांक मिळवून त्याच्याशी संपर्क केला. म्हात्रे याने सौरभ बोनकर याचा संपर्क क्रमांक दिला. त्याच्याशी संपर्क केला असता त्याने अनिकेत तांडेल याचा संदर्भ दिला. अनिकेत याने चार रेमडेसिविर इंजेक्शनची किंमत ८८ हजार रुपये त्यांना सांगितली. इंजेक्शन घेण्यासाठी २६ एप्रिल रोजी पनवेल रेल्वे स्टेशनवर येण्यास सांगितले. फिर्यादी हे पनवेल रेल्वे स्टेशनवर आले असता त्यांना बामणडोंगरी रेल्वे स्थानकावर बोलावून घेतले. तेथे फिर्यादीकडून ८८ हजार रुपये घेतले व दहा मिनिटांत इंजेक्शन आणून देतो असे सांगत तेथून निघून गेले. बराच वेळ झाला तरी ते परत न आल्याने फिर्यादीने वारंवार त्यांच्याशी संपर्क केला असता आरोपींनी त्यांना ‘पोलिसांची कारवाई झाली आहे. यात इंजेक्शन व पैसेही पोलिसांनीच जप्त केले आहेत. आता तुम्ही पैसे व इंजेक्शन मागू नका, अन्यथा तुम्ही इंजेक्शन मागवले म्हणून पोलिसांना सांगेल व त्यात    तुम्हीही अडकले जाणार’ अशी धमकी दिली. मात्र फिर्यादींनी पोलिसांशी संपर्क करीत फसवणुकीची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद केल्यावर गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस निरीक्षक संजय जोशी, साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल देवळे, पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमाळे, हवालदार नितीन वाघमारे आदींनी तांत्रिक तपासात निष्पन्न झालेल्या आरोपीच्या ठिकाणावर सापळा रचून तिघांनाही अटक केली.

तिन्ही आरोपी हे घनिष्ट मित्र आहेत. यापूर्वीही त्यांनी अशीच फसवणूक केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातील सौरभ बेरोजगार आहे. तांडेल हा सफाई कामगार तर म्हात्रे हा नोकरी करतो. तिघांनी ही रक्कम वाटून घेतली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून ८३ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. त्यात ५२ हजारांची रोकड व ३१ हजारांच्या चार मोबाइलचा समावेश आहे.

रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा होत असल्याचा गैरफायदा घेत फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. याही प्रकरणात फिर्यादी यांनी अनेक ठिकाणांहून हे इंजेक्शन देणाऱ्याची चौकशी केली त्यातून आकाश म्हात्रे याचा संपर्क मिळाला व त्यांची फसवणूक झाली. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनीही कोठेही इंजेक्शन न घेता औषध दुकानातूनच घ्यावे व फसवणूक टाळावी. – अजय लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक.