अरुंद रस्ते, रस्त्यांची झालेली दुदर्शा, त्यावर पडलेले खड्डे, गटारे, भूमिगत वीज वाहिनी घेण्यासाठी रस्ता खोदल्यामुळे पडलेले खड्डे, त्यातच महापालिकेने टाकलेले गतिरोधक, यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांची हाडे पुरते खिळखिळी होत आहेत. रस्त्यावर गतिरोधक बसवले जात असताना त्यांच्या उंचीचे प्रमाण ठरवून दिलेले आहे, असे असतानाही या नियमांना हरताळ फासला जात आहे. त्यामुळे रस्त्यावर आणि एकमेकांना खेटून बांधल्या जाणाऱ्या गतिरोधकांमुळे वाहनांना अपघात होत आहेत, याशिवाय वाहतूक कोंडीही होत आहे.
वाहनचालकांच्या वेगावर नियंत्रण राहावे, यासाठी रस्त्यावर ठारावीक अंतरावर गतिरोधक बसविले जातो; मात्र कोणत्या रस्त्यावर गतिरोधक बसविणे बंधनकारक आहे. याबाबत काही नियम आखून देण्यात आले आहेत. वाहतूक विभागाच्या परवानगीने रस्त्यावर गतिरोधक बसविता येतात. मात्र शहरातील सर्व गल्ली बोळातील रस्त्यासह ठाणे बेलापूर मार्गावर गतिरोधक बसविले जात आहे. रात्रीच्या वेळी गतिरोधकांचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. गतिरोधक दिसण्यासाठी त्यावर मारण्यात आलेले पट्टे काही दिवसांनी पुसट होतात.
ठाणे बेलापूर मार्गावर तुभ्रे, तुभ्रे पुलाखाली, दिघा तसेच गणपती पाडा या ठिकाणी टाकलेल्या गतिरोधकांचा त्रास सहन करावा लागत आहे. तुभ्रे येथे एकमेकांना खेटून बांधण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे तुभ्रे स्थानकाजवळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ऐरोली, दिवा, घणसोली, कोपरखरणे, वाशी, सानपाडा, नेरुळ, बेलापूर या परिसरांतील अंतर्गत असणाऱ्या रस्त्यावरील काही गतिरोधकावर सफेद रंगाचे पट्टे मारण्यात आले नाहीत. पालिकेच्या या अर्धवट कामांबद्दल वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.