नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत जानेवारीत दुसऱ्यांदा हापूसची आवक झाली आहे . जानेवारीतील ही विक्रमी आवक असल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. तर दुसरीकडे कोकण पट्ट्यात काही दिवसापूर्वी पडलेल्या अवकाळी पावसाने एप्रिल महिन्यात येणाऱ्या आंब्यांचा मोहर गळून पडल्याने ऐन उन्हाळ्यात आवक घटणार आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

यंदाचा हापूस हा डिसेंबर मध्येच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाला. अर्थात हा हापूस कोकण किंवा जुन्नर पट्ट्यातून नव्हता तर आफ्रिका खंडात मलावी म्हणून ओळखला जाणारा होता. मात्र त्यानंतर त्याची आवक झाली नाही. तर दुसरी आवक हि १८ जानेवारीला झाली. अमोल शिंदे या व्यापाऱ्याकडे दोन पेट्या रत्नागिरी हापूस आला होता. अशा प्रकारे कमी अधिक प्रमाणात जानेवारीत हापूस आवक होत असते. मात्र २९ तारखेला कृषी उत्पन्न बाजारपेठेत तब्बल ३६० पेट्या कोकणातून आल्या. त्यात देवगड २५० पेट्या रत्नागिरी ८० पेट्या तर माणकोट येथून ४० पेट्या आल्या. आता आलेला हापूस आंब्याचा मोहोर हा गेल्या वर्षीच्या ॲाक्टोबर महिन्यातील आहे. जानेवारीतील ही आजपर्यंतची विक्रमी आवक समजली जाते. जानेवारीत आतापर्यंत केवळ २५ ते ३० पेटी हापूस आवक होत होती. मात्र आता एकदम ३६० पेट्या आवक झाल्याने त्यामुळे ही विक्रमी आवक असल्याची चर्चा एपीएमसी फळ बाजारात होती. याचा दर प्रति पेटी १० ते १५ हजार रुपयांपर्यंत गेला आहे. 

हेही वाचा…रिल्स बनविणे पनवेल महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना भोवले

हेही वाचा… Maharashtra News Live : राज्य मागासवर्गाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांचे मनोज जरांगे पाटील यांना आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे आंबा खव्वयांसाठी एक वाईट बातमी असून कोकणातील हापूस आंबा आवक एप्रिलमध्ये अत्यल्प होईल. याचे महत्वाचे कारण म्हणजे काही महिन्यापूर्वी हापूस पिकणाऱ्या कोकण पट्ट्यात झालेला अवकाळी पाऊस आणि त्या पाठोपाठ थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने उत्पादन खूप कमी होण्याची भीती शेतकऱ्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र सध्या ज्या आंबा झाडांना मोहर आला आहे तो खूप चांगला असून जर काही नैसर्गिक संकट आले नाही तर मे महिन्यात प्रचंड आवक होण्याची आशा आहे, अशी माहिती फळ मार्केट व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.