ठाणे : राज्यातील बोगस व दुबार मतदारांमुळे राजकारण तापलेलं असताना, बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनीही या विषयावर जोरदार भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच यावर भाष्य केल्यानंतर, म्हात्रे यांनी त्यांच्या मताशी शंभर टक्के सहमती दर्शवली आहे.

मंदा म्हात्रे म्हणाल्या, मी २००४,२००९ आणि २०१४ या तीनही निवडणुकांमध्ये बेलापूरमधून लढले आहे. प्रत्येक वेळी निवडणुकीपूर्वीच अधिकाऱ्यांकडे बोगस आणि दुबार नावांची यादी सादर केली होती. पण त्यावर कारवाई होत नाही. अनेक वेळा कलेक्टर, निवडणूक अधिकारी, बीएलओ यांना सांगूनही तीच नावं यादीत पुन्हा दिसतात. जवळपास २० ते २२ हजार अशा नावांचा मी स्वतः सर्वेक्षण करून शोध घेतला आणि त्याची माहिती कलेक्टर तसेच संबंधित अधिकाऱ्यांना दिली. पण ती नावं यादीतून वगळली गेली नाहीत.

त्यांनी पुढे सांगितले की, “या बोगस नावांमुळे सकाळच्या सत्रात बोगस मतदान होतं आणि प्रामाणिक उमेदवारांना त्याचा फटका बसतो. निवडणुकीत हार-जीत हा प्रश्न नंतरचा असतो, पण बोगस मतदान हे लोकशाहीचा अपमान आहे. मी हे वारंवार अधिकाऱ्यांना सांगत आले आहे. काही ठिकाणी अधिकारी सुद्धा या नावांच्या नोंदणीत सामील असतात आणि अनेकदा या व्यवहारात पैशांची देवाणघेवाणही होत असल्याचं दिसते असे त्या म्हणाल्या.

म्हात्रे यांनी प्रशासनावर थेट टीका करताना सांगितले की, निवडणूक यंत्रणा पारदर्शक असायला हवी. बीएलओ आणि इलेक्शन ऑफिसर यांनी दरवर्षी सर्वे करायला हवा. आज आपल्या देशात संगणकीकृत प्रणाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल प्रणाली दिली आहे. मग नावं तपासणं आणि बोगस मतदार वगळणं ही फार मोठी गोष्ट नाही. फक्त इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा हवा. यानंतर त्या म्हणाल्या, अनेकदा मतदार सांगतात की, मॅडम, आमचं मतदान कोणीतरी आधीच करून गेलंय. ही परिस्थिती बदलली पाहिजे. कारण बोगस मतदानामुळे जनतेचा विश्वासच हरवतो. अशा बोगस मतदानाचा थेट फटका प्रामाणिक उमेदवारांना बसतो.

झोपडपट्टी पुनर्विकासासाठी दिवाळी भेट

राजकीय मुद्द्यांव्यतिरिक्त आमदार मंदा म्हात्रे यांनी त्यांच्या मतदारसंघात झोपडपट्टी पुनर्विकासाच्या दिशेनेही मोठा उपक्रम हाती घेतला आहे. “माझ्या मतदारसंघात बेलापूर, नेरूळ, शिवडी, रमाबाई नगर, भिम नगर विभाग तसेच अनेक ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत. या भागांतील लोक अनेक वर्षांपासून तात्पुरत्या घरात राहत आहेत. आता त्यांना कायमस्वरूपी घर मिळावं, हे माझे उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी सांगितले.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर म्हात्रे यांनी या झोपडपट्टी भागातील रहिवाशांसाठी पुनर्विकास सर्वेक्षणाची सुरुवात केली आहे. “दोन दिवसांपूर्वीपासून हा सर्वे मी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला आहे. दिवाळीनंतर २४ ऑक्टोबरपासून मी स्वतः प्रत्यक्ष त्या त्या भागात जाऊन पाहणी करणार आहे. या मोहिमेत सुमारे ३० ते ४० हजार झोपडपट्टी कुटुंबांचा समावेश होईल,” असे त्यांनी सांगितले.तसेच ज्यांच्याकडे आधारकार्ड, रेशनकार्ड, लाईटबिल, मतदानाचा पुरावा आहे, त्यांनाच पात्रतेनुसार घर देण्यात येईल. मी २०१४ पासून महानगरपालिकेकडे हे प्रकरण सतत मांडत आहे. पण काही राजकीय कारणांमुळे किंवा जाणूनबुजून काही लोकांना कार्ड दिलं जात नाही असे त्यांनी सांगितले.

दुष्काळग्रस्तांना मदतही

बेलापूरच्या आमदारांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी व्यापाऱ्यांकडून २५ ते ४५ लाख रुपयांची मदत जमा करून शाळांमध्ये वह्या वाटप केल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे दिवाळीच्या काळात समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न मी नेहमी करते. गरजूंसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि झोपडपट्टीवासीयांसाठी ही माझी दिवाळी भेट आहे, असा त्यांनी उल्लेख केला.