पनवेल: तळोजातील पाणी टंचाईने जगावे कसे असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला असून अनेकदा आंदोलने करुनही सिडको महामंडळ पिण्यासाठी पुरेसे पाणी देत नसल्याने राजकारणी मंडळीना जाग येण्यासाठी सोसायट्यांच्या प्रवेशव्दारावर पाणी नाही तर मतदान नाही असे फलक झळकवले आहेत. निवडणूक आयोगाने अद्याप लोकसभा निवडणूक जाहीर केली नसताना सुद्धा सामान्य नागरिकांनी हा पवित्रा घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे रहिवाशांना पिण्यासाठी मुबलक पाणी नसल्याने रहिवासी विविध क्लुप्त्या लावून प्रशासनाला जागवत आहेत. तर तळोजा वसाहतीच्या प्रवेशव्दारावरील रेल्वेच्या भुयारी मार्गात जमिनीखालून पाणी साचत असल्याने वाहनचालकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे.    तळोजा फेस एक येथील बलाईन या इमारतीमधील रहिवाशांनी सरकारी प्रशासन आणि राजकारणी मंडळींना जाग आणण्यासाठी हा पवित्रा घेतला आहे. या रहिवाशांनी सोसायटीच्या प्रवेशव्दारावर पाणी नाही तर मत नाही असा फलक लावून पिण्याच्या पाण्यासाठी आर्जवी केली आहे. सिडको मंडळ याच परिसरात प्रधानमंत्री आवास योजनेतून २५ हजार घरे बांधत आहे.

हेही वाचा >>>अटल सेतू आज-उद्या दहा तास बंद

 मात्र जुन्या घरांना पिण्यासाठी पाणी नाही आणि नवीन घरांचे मोठे बांधकाम सूरु असल्याने सिडको मंडळाने अगोदर रहिवाशांना पिण्याचे मुबलक पाणी द्यावे आणि त्यानंतर नवीन बांधकामांना परवानगी द्यावी अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. यापूर्वी सुद्धा विविध राजकीय पक्षांनी पिण्याचे मुबलक पाणी मिळावे यासाठी आंदोलने केली. आंदोलनानंतर काही दिवस पाणी पुरवठा सूरळीत केला जातो मात्र त्यानंतर पुन्हा पाणी टंचाईची स्थिती उद्भवत असल्याने तळोजा वासियांच्या पाणी पुरवठ्यासाठी सिडको मंडळाचे अधिकारी गंभीर नसल्याने नागरिक वैतागले आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boards at the entrances of societies in taloja saying no water no voting panvel amy
First published on: 17-02-2024 at 13:12 IST