scorecardresearch

सहा हजार रुग्णशय्या रिक्त

नवी मुंबईत महिनाभरात उपचाराधीन रुग्णांची संख्या १८ हजारांपर्यंत गेल्याने आरोग्य व्यवस्था तोकडी पडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

नवी मुंबईत प्रत्यक्षात ५ हजार ९३५ रुग्णांवर उपचार

नवी मुंबई : नवी मुंबईत महिनाभरात उपचाराधीन रुग्णांची संख्या १८ हजारांपर्यंत गेल्याने आरोग्य व्यवस्था तोकडी पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र गेले आठवडाभर रुग्णसंख्येत होत असलेली घट पाहता पालिका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. सध्या शहरात महापालिकेची चार रुग्णालये व करोना काळजी केंद्रात १२ हजार खाटांची व्यवस्था आहे, तर रविवारी शहरात १७ हजार १०५ उपचाराधीन रुग्ण होते. त्यातील ११ हजार १७० बाधित हे घरीच उपचार घेत असून प्रत्यक्षात ५ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे शहरात खाटा शिल्लक आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेतील अनुभव लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने आधीपासूनच तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी केली होती. त्यानुसार करोना केंद्रातील सर्वसाधारण, प्राणवायू खाटाप्रमाणेच विशेषत्वाने दुसऱ्या लाटेत कमतरता जाणवलेल्या अतिदक्षता व जीवरक्षक प्रणालीवाढीकडे विशेष लक्ष देण्यात आलेले होते.  त्याअनुषंगाने शहरातील विविध विभागांत १२ हजार खाटांची सुविधा उपलब्ध केली आहे.

दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर आरोग्य व्यवस्था पूर्णपणे बंद न करता तात्पुरत्या स्वरूपात केंद्रे बंद केली होती. सिडको प्रदर्शन केंद्र तसेच एमजीएम रुग्णालय सानपाडा आणि सिडको प्रदर्शन केंद्रातील अतिदक्षता सुविधा कार्यान्वित ठेवली होती. त्यामुळे आता रुग्णवाढी झपाटय़ाने झाल्यानंतरही प्रशासनाला कुठे अडचण आली नाही. रुग्णवाढीबरोबर आरोग्य व्यवस्था खुली करण्यात आली. या लाटेत अद्याप कुठेही आरोग्य व्यवस्थेबाबत गैरसोय झाली नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. सध्या शहरात राधास्वामी केंद्र तुर्भे येथे ३५८, निर्यातवन तुर्भे येथे ४९२ प्राणवायू खाटा असून दोन्ही केंद्रे समर्पित करोना काळजी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे सेक्टर १५ सीबीडी बेलापूर येथे ५०३ प्राणवायू खाटा क्षमतेचे नवीन मयूरेश करोना केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच जी.डी. पोळ रुग्णालय खारघर येथे ४५० खाटा क्षमतेचे नवीन  केंद्रही सुरू  करण्यात आलेले आहे. याशिवाय वाशी सेक्टर ३० येथील तात्पुरते बंद करण्यात आलेले २०० खाटा क्षमतेचे ईटीसी करोना केंद्र पुन्हा कार्यान्वित करण्यात आले असून ते महिला करोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. नेरुळ सेक्टर ९ येथील समाज मंदिरातील ६० खाटा क्षमतेचे केंद्र  सुरू करण्यात आले आहे. माता बाल रुग्णालय बेलापूर हे करोनाबाधित महिलांच्या प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात उपचारांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे.

लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प असले तरी सिडको केंद्रात ७५ अतिदक्षता खाटा व ३२ जीवरक्षक प्रणाली कायम सुरू आहेत. रुग्णवाढीनंतर एमजीएम रुग्णालय कामोठे या ठिकाणी १०० अतिदक्षता खाटा वाढवण्यात आल्या आहेत. कोपरखैरणे सेक्टर ५  येथील समाज मंदिरातील केंद्रात १४० खाटा, ऐरोली सेक्टर ५ येथील समाज मंदिरातील ११० खाटा, सेक्टर ३ बेलापूर येथील समाज मंदिरातील केंद्रात १०१ खाटा तसेच नेरुळ येथील आगरी कोळी भवनातील केंद्रात १०० खाटा तयार असून ती कधीही सेवेत सुरू करता येणार आहेत.

५४४ सर्वसाधारण खाटा सज्ज

रुग्णसंख्यावाढीचा आवाका लक्षात घेऊन वाशी सेक्टर १६ वाशी येथील पालिका विद्यालय (१७५ खाटा), सेक्टर ७ घणसोली येथील पालिका विद्यालय (२०९ खाटा) व सेक्टर १४ ऐरोली येथील पालिका विद्यालय (१६० खाटा) अशी ५४४ सर्वसाधारण खाटा क्षमतेची ३ नवीन करोना केंद्रे  तयार आहेत. यासोबतच नेरुळ व ऐरोली येथील रुग्णालयांमध्ये प्रत्येकी २०० अतिदक्षता खाटा क्षमतेची सक्षम आरोग्य सुविधा निर्माण करण्यात आली असून त्याचा उपयोग करोनानंतर सर्वसाधारण रुग्णांवरील उपाचारासाठी होणार आहे.

१३ नवीन केंद्रांचे काम सुरू

तिसऱ्या लाटेतील दैनंदिन रुग्णांचा चढता आलेख पाहता बाधित रुग्ण २५ हजारांच्या घरात पोहोचतील असा अंदाज होता. त्यामुळे नवीन १३ ठिकाणी करोना केंद्रांचे नियोजन असून यातून २६७० खाटा उपलब्ध होणार आहेत. या केंद्राचे काम प्रगतिपथावर आहे.

४०५२ प्राणवायू खाटा

महापालिका करोना केंद्रात ३०५२ व खासगी रुग्णालयांता १००० अशा ४०५२ हून अधिक प्राणवायू खाटा सज्जता ठेवण्यात आल्या आहेत.

१२०० अतिदक्षता खाटा

महापालिकेच्या ७२५ आणि खासगी रुग्णालयातील ४७५ खाटा अशा प्रकारे १२०० हून अधिक अतिदक्षता खाटांचे  नियोजन आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona patients beds empty infected ysh

ताज्या बातम्या