नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेच्या मॉडर्न स्कुल, वाशी येथे “दुर्गोत्सव २०२५ – अमृत महाराष्ट्र” या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत दुर्ग (किल्ले) प्रतिकृती निर्मिती स्पर्धा उत्साहपूर्ण आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडली. महाराष्ट्र शासनाकडून १० ऑक्टोबर रोजी सर्व शाळांना देण्यात आलेल्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गसंस्कृतीचा जागर करणारा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रायगड, राजगड, प्रतापगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, लोहगड, विजयदुर्ग, शिवनेरी अशा ऐतिहासिक आणि गौरवशाली किल्ल्यांच्या प्रतिकृती अत्यंत कल्पकतेने तयार केल्याचे पाहायला मिळाले. तर काही विद्यार्थ्यांनी माती, थर्माकॉल, कार्डबोर्ड, रंगीत कागद आणि नैसर्गिक वस्तूंचा वापर करून अत्यंत बारकाईने दुर्गरचना साकारली होती. प्रत्येक गटाने आपल्या किल्ल्याची निर्मिती करताना त्याचा इतिहास, स्थापत्य वैशिष्ट्ये आणि लढाया यांची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. त्यामुळे ही केवळ स्पर्धा न राहता हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक ज्ञानात भर पडणारा उपक्रम ठरला.

या स्पर्धेदरम्यान, प्रत्येक गटाने आपल्या किल्ल्याचे छायाचित्रण आणि चित्रीकरण केले असून ही चित्रफिती दुर्गोत्सवच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या सर्जनशीलतेचा व इतिहासाची जाण दर्शविणाऱ्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या गटाचा किल्ला शासनाकडे अंतिम निवडीसाठी पाठविण्यात आला आहे.

मुख्याध्यापिका सुमित्रा भोसले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना, “दुर्गोत्सव हा केवळ एक उपक्रम नसून तो आपल्या सांस्कृतिक परंपरेचा आणि शिवकालीन वैभवाचा अभिमान जागवणारा सोहळा आहे. विद्यार्थ्यांनी यामधून जपलेला इतिहासभाव आणि देशभक्ती हीच खरी या स्पर्धेची जमेची बाजू आहे.” असे सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांनी घरात आणि सोसायटीतही पालकांच्या मदतीने असे किल्ले तयार करून या अभियानात सहभाग घ्यावा, म्हणजे ऐतिहासिक जाणीव अधिक दृढ होईल. असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पर्यवेक्षिका मनिषा संकपाळ, कला शिक्षक, वर्ग शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राविषयी आदर, इतिहासाची ओळख आणि वारसा जपण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे. “दुर्गोत्सव २०२५ – अमृत महाराष्ट्र” हा उपक्रम राज्यभरातील शाळांमधून साजरा होत असून, वाशीतील रयत शिक्षण संस्थेच्या मॉडर्न शाळेने या अभियानात सृजनशीलतेचा आणि संस्कारांचा सुंदर संगम साधला आहे.