नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन व जुन्या कांद्याची आवक होत असून त्याप्रमाणात मालाला उठाव नसल्याने बाजारभाव उतरले आहेत. बाजारात मागील आठवड्यात ३० ते ३५ रुपयांनी उपलब्ध असलेला जुना कांदा आता २५ व २८ रुपयांनी विक्री होत आहे. तर २० ते २२ रुपयांनी विकला जाणारा नवीन कांदा १५ ते २० रुपयांनी उतरला आहे.

एपीएमसीत नोव्हेंबर – डिसेंबर मध्ये नवीन कांद्याची अधिक आवक होत असते. मात्र यावेळी अद्याप बाजारात नवीन कांदा २-३ गाडी दाखल होत असून साठवणुकीचा जुना कांदा बाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहे. बाजारात आज मंगळवारी १०० गाड्यांची आवक झाली आहे. कांद्याची पुणे, नाशिक ,नगर मधून आवक सुरू असून एपीएमसी बाजारात दैनंदिन १०० हुन अधिक गाड्यांची आवक असून उठाव नसल्याने दरात घसरण होत आहे. एपीएमसी बाजारात चांगल्या प्रतीच्या कांद्याला अधिक मागणी आहे. मात्र बाजारात हलक्या प्रतीचा कांदा अधिक असून उच्चतम प्रतीचा कांदा कमी प्रमाणात आहे . हलक्या प्रतीला १० ते १२ रुपये दर आहे. पंरतु ग्राहकांमधून एक नंबर कांद्याला अधिक मागणी आहे. त्यामुळे इतर कांद्याला उठाव कमी झाल्याने दरात घसरण होत आहे.

हेही वाचा: सागरी सुरक्षा कवच अंतर्गत उरणच्या किनाऱ्यावर सतर्कता; पुढील ३६ तास चालणार शोध मोहीम

नवीन बटाट्याची प्रतिक्षा
बाजारात मंगळवारी बटाट्याच्या ५० गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यापैकी केवळ २ ते ३ गाड्या तळेगाव येथील नवीन बटाटा आवक सुरू झाली आहे. तर दुसरीकडे बाजारात कोल्ड स्टोरेज मधील जुना बटाटा दाखल होत असून तो चवीला गोड लागत असल्याने याला मागणी कमी आहे. त्याचबरोबर नवीन बटाटाही कमी प्रमाणात दाखल होत आहे. त्यामुळे बटाट्याच्या दरातही घसरण होत आहे. मागील आठवड्यात २० ते २५ रुपयांनी उपलब्ध असलेल्या बटाटा आता १४ ते १७ रुपयांवर विक्री होत आहे.