पनवेल ः नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रातील (नैना प्रकल्प) ४० गावांमध्ये सिडको महामंडळ रस्त्यांच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. या कामांचे ठेके सुद्धा सिडको मंडळाने विविध ठेकेदारांना वाटप केले. नैना स्थापनेनंतर ११ वर्षांनी पहिल्यांदा नैना प्रकल्पात रस्ते व इतर पायाभूत सुविधांचे काम सूरु करण्यासाठी सिडको मंडळाने कंबर कसली असल्याने बुधवारी दुपारी देवद गावामध्ये या कामांची सूरुवात करण्यासाठी ठेकेदार कंपनीचे दोन अधिकारी गावात दाखल झाल्यानंतर अधिका-यांना ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला. जोपर्यंत शेतक-यांचे प्रश्न सिडको मंडळ सोडवत नाही, तोपर्यंत नैना प्रकल्पाचे एकही काम सूरु होऊ देणार नाही.

असा पवित्रा संतप्त शेतक-यांनी घेतल्याने ठेकेदार कंपनीच्या अधिका-यांना काम न करता परतावे लागले. विधानसभा निवडणूकांच्या प्रचारात नैना प्रकल्पाला शेतक-यांकडून तीव्र विरोध होत आहे. देवद गावात भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आक्रमक भूमिका घेतल्याने काही वेळेसाठी तणावाचे वातावरण पसरले होते. या सर्व स्थितीमुळे नैना प्रकल्पाचे काम रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.  

हेही वाचा…विद्यार्थ्यांकडून कुटूंबांपर्यंत पर्यावरण रक्षणाचा संदेश

पनवेल तालुक्यातील गावांमधील शेतक-यांचा नैना प्रकल्पाला विरोध आहे. शेतक-यांची जमीन सिडको मंडळाने २०१३ सालच्या कायद्यानूसार संपादीत करावी आणि नैना प्रकल्प उभारावा म्हणजे शेतक-यांना जमीनीचा चांगला मोबदला मिळेल असा सूर शेतक-यांमध्ये एेकायला मिळतो. मात्र सिडको मंडळाने जमीन संपादन केल्यास कोट्यावधी रुपयांची नूकसान भरपाई देण्याएेवजी शेतक-यांच्या जमीन क्षेत्रापैकी ४० टक्के विकसित भूखंड देण्याचा प्रस्ताव शेतक-यांसमोर मांडून विकासाला सूरु केली आहे. यामुळे हा प्रकल्प रखडला आहे. ११ वर्षांपासून रखडलेल्या नैना प्रकल्पामधील रस्ते, मलनिसारण वाहिनी व इतर बांधकामे सूरु करण्यासाठी सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल हे आग्रही आहेत. त्यामुळे साडेचार हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे ठेके सिडको मंडळाने विविध कंपन्यांना दिले. यामधील सर्वात मोठा ठेका २,३६२ एल. अॅण्ड टी कंपनीला सिडकोने दिला आहे. तसेच शेकापचे उद्योजक जे. एम. म्हात्रे यांच्या मालकीच्या जे.एम. म्हत्रे इन्फ्रा. आणि आ. प्रशांत ठाकूर यांच्याशी निगडीत असणा-या टीआयपीएल कंपनीला याच कामातील काही ठेके सिडकोने दिले होते. मात्र भाजपचे आ. ठाकूर यांनी जोपर्यंत नैना प्रकल्पातील शेतक-यांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत नैना प्रकल्पाची कामे सूरु कऱणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे सिडकोच्या अडचणी वाढल्या आहेत.

हेही वाचा…Ganesh Naik: ‘माझे विरोधक स्वर्गवासी झाले, एकही जिवंत नाही’, भाजपा नेत्याच्या विधानानंतर शिंदे गट आक्रमक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आ. ठाकूरांच्या भूमिकेनंतर भाजपचे पनवेलच्या गावागावांमधील कार्यकर्ते नैना विरोधी लढ्यात प्रत्यक्ष उतरले आहेत. बुधवारी दुपारी देवद ग्रामपंचायतीमध्ये एल. अॅण्ड टी कंपनीचे दोन अधिकारी काम सूरु करण्याची माहिती देण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये आल्यावर ग्रामपंचायतीमध्ये परिसरातील ग्रामस्थ जमा झाले. या परिसरातील रायगड जिल्हापरिषदेचे भाजपचे माजी सदस्य अमित जाधव यांनी लोकसत्तेला दिलेल्या माहितीनूसार एल. अॅण्ड टी कंपनीचे अधिकारी कामाची पूर्वतयारी आणि देवद गावातील सर्वे क्रमांक ७०/ अ या प्रत्यक्ष ठिकाणच्या पाहणीसाठी  आल्याचे या दोन अधिका-यांनी सांगीतल्यावर ग्रामस्थ संतापले. जोपर्यंत ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत नैनाची एकही वीट ग्रामस्थ लावू देणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. देवद ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद वाघमारे, विजय वाघमारे, निलेश वाघमारे, संदेश वाघमारे, अविनाश गायकवाड, वासूदेव भिंगारकर यांनी विरोध केला. ही बातमी ग्रामस्थांमध्ये पसरल्यानंतर पाली व विचुंबे येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी देवद ग्रामपंचायतीकडे धाव घेऊन नैनाच्या प्रकल्पाच्या सूरु होणा-या कामाला विरोध केला. याबाबत सिडको मंडळाच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क साधला मात्र संपर्क होऊ शकला नाही.