पनवेल : गुढीपाडवा नववर्षाचा पहिल्या दिवशी करंजाडेवासियांच्या सदनिकेच्या नळांमध्ये पिण्याचे पाणी आले नसल्याने करंजाडेवासियांनी पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेबद्दल संताप व्यक्त केला. करंजाडे वसाहतीमधील सेक्टर ४ मधील मेघना शिवम गृहनिर्माण संस्थेमध्ये मंगळवारी सायंकाळी वसाहतीमधील अनेक गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन नेमके काय करता येईल याविषयी बैठक घेतली. लाखो रुपये किमतीचे घर खरेदी केले. पिण्याचे पाणी मिळत नसल्याने लेखी पत्रव्यवहार, सिडको मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी आणि बेलापूर येथील सिडको भवनावर हंडामोर्चा काढला. परंतू अजूनही करंजाडेवासियांचे पाणी हाल संपलेले नाहीत.

सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मोटारपंपात काही दोष असल्याने मागील काही दिवसांपासून पाणी पुरवठा कमी होत असल्याचे सांगितल्याने पुन्हा करंजाडेवासिय आक्रमक झाले आहेत. करंजाडे नोड फ्लॅट ओनर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत गुजर यांनी मंगळवारच्या शिवम मेघना सोसायटीमध्ये झालेल्या बैठकीत कोट्यावधी रुपये केंद्र व राज्य सरकार रस्त्यांसाठी संपवत आहे मात्र पाणी ही जीवनावश्यक मुलभूत गरज असताना एमजेपीसारखी यंत्रणा मोटारपंप हे आप्तकालिन तातडीने का उपलब्ध ठेवत नाही असा प्रश्न उपस्थित केला.

हेही वाचा…बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी

या बैठकीमध्ये वकिलीची व्यवसाय करणाऱ्या अनेकांनी शासन लक्ष देत नसल्याने लोकायुक्त व न्यायालयाचे दार ठोठावे असा मुद्दा मांडला. सिडकोच्यावतीने आप्तकालिन स्थितीमध्ये टॅंकरने पाणी पुरवठा करणे गरजेचे असूनही सिडकोचे अधिकारी टँकरने पाणी पुरवठा करत नसल्याकडे अनेक पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.