ठाणे – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठींबा देण्यासाठी मराठा बांधव मुंबईत मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झाला असून, रेल्वे स्थानकांवर आणि रस्त्यांवर गर्दीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी ठाणे आणि नवी मुंबईच्या वेशीवरून येणारी आंदोलकांची वाहने रोखून धरण्यास सुरूवात केल्याने कोंडी वाढली आहे. तसेच जेवण नेणारी वाहने रोखण्यात येत असल्याने मराठा आंदोलकांमधून संताप व्यक्त होत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करीत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळत असून, हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे आझाद मैदान आणि परिसर आंदोलकांच्या गर्दीने गजबजलेला आहे. आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर अनेक नोकरदारांनी सोमवारी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला.
मुंबईतील आंदोलनस्थळी केवळ पाच हजार आंदोलक आणि दीड हजार गाड्यांना परवानगी असताना त्याच्या अनेक पटीने आंदोलक आणि गाड्या वाढल्या आहेत. परिणामी आझाद मैदानासह आसपासचे परिसर आणि रेल्वे स्थानक परिसर आंदोलकांच्या गर्दीमुळे गजबजलेले आहेत. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे आणि नवी मुंबई शहरातून मुंबईत प्रवेश करणाऱ्या गाड्यांची तपासणी मुंबई पोलिसांनी सुरु केली असून यात आंदोलकांची वाहने मुंबई पोलिस रोखून धरत आहेत. त्यामुळे नवी मुंबईत वाहनांच्या रांगा सुमारे पाच किलोमीटर पर्यंत लागल्या आहेत.
वाहनांच्या लांब रांगा
शीव पनवेल मार्गांवरून मुंबईला जाताना खाडी पूल जेथे संपतो ते मानखुर्द पर्यंत पोलिस नाकाबंदी करत आहेत. यात सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यात आंदोलकाचे वाहन असेल तर त्यांच्या गाड्यांना मुंबईत प्रवेश दिला जात नसून ही वाहने पुन्हा माघारी पाठविण्यात येत आहेत. परिणामी शीव पनवेल महामार्गांवरील मुंबईच्या मार्गिकेवर सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
खाडी पूल ते सानपाडा अशी सुमारे चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. दुपारी हि वाहनांच्या रांगा काही प्रमाणात कमी झाल्या असल्या तरी नाकाबंदीत तपासणी सुरूच असल्याने वाहतूक कोंडीचा फटका वाहन चालकांना बसला. या बाबात वाशी वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कदम यांनी सांगितले, “ मुंबईत नाकाबंदी असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याच्या दिशेने पूर्ण मार्ग सुरळीत आहे. मुंबईकडे मात्र जड अवजड वाहनांना आम्ही सोडत नाहीत.”
जेवण नेणारी वाहने अडविली मुंबईतील आझाद मैदान येथे जमलेल्या मराठा आंदोलकांसाठी ठाणे शहरातून मराठा समाजाचे कार्यकर्ते घराघरातून चटणी, भाकर, चपाती असे अन्न पदार्थ गोळा करून सोमवारी दुपारी मुंबईच्या दिशेने जात होती. ही वाहने ठाणे आणि मुंबईच्या वेशीवरील आनंदनगर नाक्याजवळ येताच मुंबई पोलिसांनी ही वाहने अडविली. मराठा आंदोलकांनी हा अन्यायकारक प्रकार असल्याचे सांगत या घटनेचे निषेध नोदवून घोषणाबाजी सुरू केली आणि त्यानंतर पोलिसांनी ही वाहने सोडली, अशी माहिती मराठा मोर्चाचे पदाधिकारी पांडुरंग भोसले यांनी दिली.