नवी मुंबई : मुंबईतील आझाद मैदान येथे मराठा आरक्षण साठी आंदोलन सुरु आहे. त्यासाठी आलेले सुमारे २० हजार आंदोलकांचा मुक्काम नवी असल्याने शहरात वाहतूक कोंडी सुरवातीला झाली मात्र वाहतूक कोंडीवर ठोस उपाय योजना केल्याने काहीसा दिलासा सामान्य वाहन चालकांना मिळाला आहे.

पाच दिवसांच्या पासून मुंबईतील आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरु केल्यावर मुंबईत येणाऱ्या आंदोलकांची संख्या झपाट्याने वाढत गेली. मुंबई सोबतच नवी मुंबईत हजारोच्या संख्येने आंदोलक आले. मात्र पाऊस अद्याप सुरु असल्याने दिवसभर मुंबईत असणाऱ्या बहुतांश आंदोलकांनी मुक्कामासाठी उत्तम सोय असल्याने नवी मुंबईला पसंती दिली. नवी मुंबईतील सिडको प्रदर्शनी केंद्र, कांदा बटाटा आणि फळ मार्केट, तेरणा मैदान या ठिकाणी मुक्काम करत जेवण न्याहारी करून मुंबईत जाणे आणि मावळतीला मुक्कामासाठी नवी मुंबईत येणे असा दिनक्रम असल्याने सकाळी आणि रात्री शीव पनवेल महामार्गांवरील वाहतूक कोंडी सुरु झाली.

या शिवाय पुणे मुंबई द्रुत गती मार्ग संपल्यावर कळंबोली, आणि अटल सेतू मार्गाने जाणाऱ्या मार्गांवर गव्हाण फाटा, पळस्पे फाटा या ठिकाणी राज्यातून येणाऱ्या आंदोलक वाहनांच्या मुळे वाहतूक कोंडी होत होती.

उपाययोजना

राज्यातून येणाऱ्या आंदोलकांना नवी मुंबई तून मुंबईत जाणे सोपे पडत असल्याने आंदोलकांचा लोंढा नवी मुंबईत धडकत आहे त्यात आंदोलन लवकर आटोपत नाही लक्षात येताच वाहतूक पोलिसांनी उपयोजना सुरु करून त्याची कडक अंमल बजावणी सुरु केली आहे. त्यात सर्वात अगोदर जड अवजड वाहनांना प्रवेश वाहतूक आणि पार्किंग बंदी करण्यात आली. वॉर रूम उभा करीत चोवीस तास सिसिटीव्ही द्वारे वाहतूक कोंडीवर नजर ठेऊन आहेत. तसेच मोबाईल ऍप वरील मॅप वर चार कर्मचारी कायम नजर ठेऊन आहेत. ज्या ठिकाणी वाहून कोंडी झाली त्या ठिकाणी पाच मिनिटांच्या आत वाहतूक पोलीस पोहचून वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवता येईल अशी रचना करण्यात आली आहे.

सर्व वाहतूक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कायम सतर्क राहण्याचे आदेश दिले असून अत्यावश्यक कामा व्यतरिक्त सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सोळाही बिट पोलीस वरिष्ठ निरीक्षक सहित सर्वांना फोन वर सामान्य जणांशीही संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वतः पोलीस उपायुक्त सर्व फोन घेत संपर्क करीत असल्याने कर्मचारी अधिकारीही तत्पर राहत आहेत.

तरीही काही ठिकाणी त्रुटी

जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी असल्याने जेएनपीटी मार्गांवर दास्तान फाटा ते चिर्ले ते पुढे दिघोडे, गव्हाण फाटा मार्गांवर मोठ्या प्रमाणात जड अवजड वाहणांच्या रांगा लागल्या आहेत. देश भरातून ही वाहने आली असून आंदोलना मुळे सर्व वाहतूक ठप्प झाली आहे.

मुंबईत नाकाबंदीचा फटका नवी मुंबई वाहतुकीवर

न्यायाल्याने आंदोलकांनाच्या बाबत कडक निर्देश दिल्या नंतर मुंबई पोलिसांनी आंदोलक गाड्यांना मुंबईत प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे वाशी खाडी पूल संपताच त्या ठिकाणी नाका बंदी द्वारे मुंबई पोलिसांनी वाहन तपासणी सुरु केली आहे. वाहनात आंदोलक असतील तर गाड्या परत पाठवल्या जातं आहेत. त्यामुळे नवी मुंबई पर्यंत सुमारे चार पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागत आहेत. वास्तविक नवी मुंबईत वाहतूक कोंडी नाही असेही वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अनंत चतुर्दशी नंतर सर्वाधिक गणेश मूर्ती विसर्जन सातव्या दिवशी होते. त्यात मराठा आंदोलकांच्या गाड्यांची भर पडली आहे. त्यामुळे अतिरिक्त ताण पडून वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नेरुळ वाशी येथे आवश्यकते नुसार नो पार्किंग आणि मार्ग बदल करण्यात आले आहेत.