MMR Development Issue in Mumbai local body elections : नवी मुंबई विमानतळाचे उद्धाटन होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा संपूर्ण रोख महामुंबईच्या विकासावर केंद्रीत होता. या कार्यक्रमातच मुख्यमंत्र्यांनी पालघर जिल्ह्यात चौथी मुंबई विकसीत केली जाईल अशी घोषणा केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या वर्षी याच परिसरात अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या मुंबईची घोषणा केली होती. गेल्या काही वर्षांत राज्यातील महायुती सरकारने आपला मोर्चा तिसऱ्या, चौथ्या मुंबईच्या विकासाकडे वळवला आहे. ते पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा त्यातही भाजपच्या प्रचाराची दिशा काय राहील हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्धाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असताना मुंबईकरांना नव्या मेट्रो-३ प्रकल्पाच्या उद्घाटनाची उत्सुकता होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्रकल्प वेगवेगळ्या कारणांमुळे लांबला. हा धागा पकडत मोदींसह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तत्कालिन सरकारला धारेवर धरले. ‘प्रकल्प लांबविणे हे विरोधकांचे पाप’ अशा शब्दात पंतप्रधानांनी विरोधकांची संभावना केली. मेट्रो-३ ला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता महायुती सरकारचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे.

‘सुपारी घेऊन प्रकल्प अडविणारे नक्षलवादीच’ या शब्दात मुख्यमंत्र्यांनी लोकसत्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. मुंबई महानगर पट्टयात होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये भाजप महायुतीची प्रचाराची दिशा नेमकी कशी असेल हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या निमीत्ताने उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येताना दिसत आहेत. त्यामुळे हा संघर्ष आगामी काळात मुंबईपुरताच मर्यादित रहाण्याची अजिबात शक्यता नाही.

मुंबईबरोबर मुंबई महानगर पट्टयात तितक्यात महत्वाच्या महापालिका जिंकणे हे महायुतीचे लक्ष्य रहाणार आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, मिरा भाईदर या महत्वाच्या महापालिकांवर सत्ता मिळविणे हे महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन पक्षांचे लक्ष्य रहाणार आहे. विरोधी पक्षांशी दोन हात करत असताना हे दोन्ही पक्ष एकमेकांशीही स्पर्धा करत आहेत. या संपूर्ण पट्टयाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जे प्रकल्प आखले जात आहेत त्याचे श्रेय देखील आपल्याला मिळेल अशी सुप्त स्पर्धा महायुतीच्या या दोन घटकपक्षात नसेल असा दावा कुणीही करणार नाही. या स्पर्धेतून तिसरी आणि चौथ्या मुंबईचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आतापासूनच आणला जात आहे. प्रचारात जर विकासाची आखणी करायची असेल तर आतापासूनच या मुद्दयांची पेरणीही महत्वाची ठरते. नवी मुंबई विमानतळ प्रकल्प शुभारंभ सोहळा या पेरणीसाठी पोषक ठरला.

MMR Development : महामुंबईतील वर्चस्वाची स्पर्धा

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मुंबईसह राज्यभर पराभवाचे तोंड पहावे लागले. कोकण पट्टयात मात्र महायुतीला चांगल्या जागा मिळाल्या. ठाणे जिल्ह्यात भिवंडीचा एकमेव अपवाद वगळला तर पालघर, ठाणे, कल्याण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पनवेल-कर्जतमध्ये मोडत असलेल्या मावळ प्रांतातही महायुतीला विजय मिळाला. लोकसभेतील हे यश विधानसभा निवडणुकीत महायुतीने विस्तारत नेले. पालघर, ठाण्यापासून रत्नागिरी, सिंधुदुर्गापर्यत पसरलेल्या कोकण पट्टीत महायुतीला ९५ टक्क्यांपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवता आला.

विधानसभेपाठोपाठ होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील महापालिकांमध्ये या कामगिरीची पुनरावृत्ती झाल्यास विरोधकांना हा मोठा धक्का असणार आहे. त्यामुळे ठाणे, रायगड, पालघर या तीन जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर महायुतीने आतापासूनच लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते. नवी मुंबई विमानतळाचा सोहळा होत असताना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईचे सुतोवाच करताना हेच प्रदेश आगामी विकासाचे केंद्र ठरतील असा दावा केला.

‘अटल सेतू’च्या पायथ्याशी तिसरी मुंबई, पुढे विमानतळ, याच भागात उन्नत मार्ग, मेट्रोचे जाळे, पालघर जिल्ह्यात चौथी मुंबई, तेथील वाढवण बंदर, समुद्रातील विमानतळ, बुलेट ट्रेन या आणि अशा प्रकल्पांच्या भोवती सध्या फडणवीस, शिंदेची प्रचाररणनिती आखली जात असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. या दोन बड्या राजकीय नेत्यांमधील सुप्त राजकीय स्पर्धाही यानिमित्ताने दिसते आहे. दिवाळी असो वा दसरा शिंदे ठाणे, डोंबिवली सोडत नाहीत असे सध्याचे चित्र आहे. या संपूर्ण पट्टयात विकासाचा ‘रोडमॅप’ आपणच कसे आखत आहोत याची पद्धतशीर पेरणी सध्या शिंदे करताना दिसतात. उद्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका भाजपविरोधात लढविण्याची वेळ आलीच तर ‘विकासा’चा हा अजेंडा कामी येईल याची जाणीव शिंदेना आहे.

MMR Development : तिसरी, चौथी मुंबई …काय आहे नेमकी आखणी ?

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे अलिकडे ज्या तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईला आपल्या भाषणाचा केंद्र ठरवित आहेत ते प्रकल्प नेमके आहेत तरी काय याविषयी उत्सुकताही आहे. या प्रकल्पांमुळे भारताची आर्थिक राजधानी आणि व्यापक मुंबई महानगर प्रदेश (MMR) हे एकमेकांशी पूरक ठरतील असे दावे केले जात आहेत. मुंबई महानगर प्रदेशामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे तसेच पालघर, ठाणे आणि रायगड या शेजारच्या भागांचा मोठा परिसर समाविष्ट आहे. हा प्रदेश ६,३२८ चौ.किमी क्षेत्रावर पसरलेला असून दोन कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या येथे राहते.

महाराष्ट्र शासन आणि नीती आयोग यांनी मिळून महाराष्ट्राला १.५ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा, तसेच राज्याला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून घडविण्याचा संकल्प केला आहे. त्याचे केंद्रही हा प्रदेश आहे. मुंबई शहर आणि उपनगर हे देशाचे आर्थिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहेत. ठाणे–रायगड पट्ट्यात विकसित केलेली नवी मुंबई ही “दुसरी मुंबई” म्हणून ओळखली जाते, जी मूळ मुंबईवरील लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी उभारली गेली. आता तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई हे दोन नवे केंद्र या वाढत्या आर्थिक प्रवाहाला पुढे नेतील, अशी आखणी केली जात आहे. चौथी मुंबई पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर आणि प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात उभारली जाणार आहे.

वाढवण बंदर (Vadhavan Port) हे रायगडमधील जेएनपीए (Nhava Sheva) पेक्षा तीनपट मोठे असेल. जेएनपीए हे सध्या भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर आहे, जे देशातील सुमारे ५०% कंटेनर वाहतूक हाताळते. वाढवण ज्या भागात प्रस्तावित करण्यात आला आहे ते ठिकाण दक्षिण मुंबईपासून सुमारे १४० किमी अंतरावर, महाराष्ट्र–गुजरात सीमेच्या जवळ आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत (जमीन संपादनासह) ₹७६,२२० कोटी रुपये इतकी सध्या तरी ठरविण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (MADC) ने याच भागात ग्रीनफिल्ड विमानतळाच्या उभारणीसाठी प्राथमिक व्यवहार्यता अभ्यास (pre-feasibility study) सुरू केला आहे. तिसऱ्या मुंबईत मुंबई, नवी मुंबईपेक्षा तीनपट मोठे नवे शहर विकसित करण्याची योजना आहे. येथे विविध थीम आधारित झोन असतील. एज्युसिटी (१० आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे), स्पोर्ट्स सिटी, मेडिसिन सिटी, नॉलेज सिटी, आणि इनोव्हेशन सिटी तसेच अत्याधुनिक सायबर सिक्युरिटी सेंटर तयार केले जाईल. जे सायबर गुन्ह्यांविरोधात एकात्मिक पद्धतीने काम करेल. मुंबई महानगर प्रदेशातील जोडणी वाढवण्यासाठी अनेक कनेक्टर, मुख्य रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो मार्ग, पूल आणि जलमार्ग उभारण्याचे नियोजन सरकारने हाती घेतले आहे. आगामी निवडणुकीत हे सर्व प्रकल्प प्रचाराच्या केंद्रस्थानी आणण्याचे नियोजन भाजप आणि शिंदे गटाकडून आतापासूनच सुरू झाले आहे.

MMR Development : ठाकरेंचा प्रचारही याच मुद्दयांभोवती

तिसरी आणि चौथी मुंबई आणि त्याभोवतीची विकासकामांभोवती महायुतीचा प्रचाराची पेरणी सुरु असताना राज ठाकरे यांनी नुकत्याच एका जाहीर सभेत महायुतीच्या या प्रचारातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. पालघर जिल्ह्यात विमानतळ, बंदर नेमके कोणाच्या फायद्यासाठी आणले जात आहे ? हा मुंबई काबीज करण्याचा डाव नाही ना ? असे प्रश्न उपस्थित करत राज यांनी महायुतीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. राज्य सरकार ज्या तिसऱ्या मुंबईची हवा निर्माण करु पहात आहे तेथील जमीन संपादनाचा मुद्दा आतापासूनच तापत असल्याचे चित्र आहे.

उरण, न्हावाशेवा, जासई भागातील प्रकल्पग्रस्तांना एमएमआरडीकडून सुरू असलेले जमिनीचे संपादन मान्य नाही. वाढवण बंदराला विरोध करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तेथेही प्रकल्पग्रस्त, शेतकरी संघटना या प्रकल्पांविरोधात रस्त्यावर उतरताना दिसतात. विमानतळाची उभारणी करत असताना मोठया प्रमाणावर झालेली पर्यावरणाची हानी, या भागात उभारलेल्या रस्ते, पुलांमुळे आतापासूनच ठराविक भागात येऊ लागलेला पूर असे काही महत्वाचे प्रश्नही यानिमीत्ताने उभे राहीले आहेत. ‘बुलेट ट्रेन’चा आम्हाला फायदा काय हा प्रश्न राजकीय प्रचाराचा मुद्दा आधीच झाला आहे. मुंबई महानगर पट्टयात निवडणुकांचे बिगुल वाजताच तिसरी, चौथी मुंबई आणि त्याभवती सुरू असलेल्या विकासाचा गाजावाजा प्रचाराचा परिघ व्यापेल हे मात्र निश्चित .