काचेवर टकटक करून अथवा पैसे पडल्याचे चालकांना सांगून मोटरगाडीतील महागड्या वस्तू चोरणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला मुंबई पोलिसांनी तामिळनाडूतून अटक केली. त्यासाठी तब्बल दोनशेहून अधिक सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली.
मुंबई व नवी मुंबई परिसरात सक्रिय असलेल्या या आंतरजिल्हा टोळीचा अनेक चोऱ्यांमध्ये सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. लक्ष्मण एस कुमार(३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो तामिळनाडू येथील रामजी नगर येथील मिल्क कॉलनीतील रहिवासी आहे.
तक्रारदार ओशिवरा पोलिसांच्या हद्दीतील आदर्श नगर पेट्रोल पंपासमोरील दुकानात१६ जूनला खरेदी करण्यासाठी गेले होते. ते त्यांच्या मोटारीत बसले असता एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या गाडीच्या डाव्या बाजूला टकटक करून बाजूला पैसे पडले असल्याचे सांगितले. तक्रारदार पडलेले पैसे उचलण्यासाठी गाडीच्या बाहेर उतरल्या असता आरोपीच्या दुसऱ्या साथीदाराने बाजूचा दरवाजा उघडून गाडीत ठेवलेली बॅग चोरली. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे व पोलीस निरीक्षक सचिन जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पथकाने याप्रकरणी तपास सुरूवात केली.
आरोपींकडून अॅपल कंपनीचे मॅकबुक व लॅपटॉप, ब्लुटुथ स्पीकर असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरोधात मुंबईतील माटुंगा व चेंबूर परिसरात अशाच प्रकारे चोरी केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपीचे काही साथीदार मुंबई व नवी मुंबईत सक्रिय असल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे. त्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
तपास कसा झाला ? –
कोणताही पुरावा नसताना पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी, खाजगी तसेच अंधेरी रेल्वे स्थानक, दादर रेल्वे स्थानक, लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरातील २०० ते २५० पेक्षा अधिक सीसी टीव्हींचे चित्रीकरण करून आरोपीची ओळख पटवली. त्याचे छायाचित्र मिळवले. त्यानंतर पोलिसांनी खबऱ्यांच्या मार्फत आरोपीचा शोध खेतला असता तो तामिळनाडू येथील रहिवासी असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार एक पथक तामिळनाडू येथे रवाना करण्यात आले. पण आरोपी सराईत असल्यामुळे त्याच्या परिसरातून त्याला ताब्यात घेणे शक्य नसल्याचे पोलीस पथकाच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या हालचालींची माहिती घेऊन श्रीरंगम परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.