नवी मुंबई: नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात असणाऱ्या खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीतून स्कॉर्पिओ गाडी चोरी करणाऱ्या संशयित आरोपींना गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. संशयित आरोपींनी राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्रात पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाले मात्र सातत्यपूर्ण माग काढल्यावर अखेर संशयित आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. अटक संशयित आरोपींच्या चौकशीत वाहन चोरीचे अन्य चार गुन्हे उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

सुरेश कालुराम उदाणी, (वय ३० वर्षे ) आणि रिचपाल पप्पुराम बिष्णोई,( वय २४ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. दोन्ही संशयित आरोपी हे राजस्थान मधील तालुका लोहावत,जिल्हा फलोदी येथे राहणारे आहेत. काही दिवसापूर्वी खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीतून स्कॉर्पिओ गाडी चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास खांदेश्वर पोलीस करत असले तरी त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करत होती. गुन्हे शाखेने तपास सुरू केल्यावर त्यांनी सर्व प्रथम घटनास्थळी जाऊन सर्व परिसर पाहणी केली तसेच उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज गोळा करून तपासणी सुरु केली या शिवाय तांत्रिक तपास हि एकीकडे सुरु होता. या तपासाला यश आले आणि संशयित आरोपी हे राजस्थान येथील लोहावत तालुक्यात असल्याचे स्पष्ट झाले.

हि माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त . सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बनकर, विश्वास पवार पोलीस हवालदार आतिश कदम, पोलीस नाईक अझहर मिर्झा,पोलीस शिपाई सचिन पाटील यांचे पथक राजस्थान येथे रवाना झाले.

मात्र संशयित आरोपी हे गुजरात येथे असल्याचे तांत्रिक तपासात समोर आल्याने हे पथक गुजरात येथे गेले. मात्र संशयित आरोपी हे पुन्हा महाराष्ट्रात आल्याचे कळल्यावर पोलीस पथकाने राज्यात माग काढणे सुरु केले. मात्र संशयित आरोपी वारंवार जागा बदलत असल्याने पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होते.

१८ तारखेला हेच संशयित आरोपी कल्याण भिवंडी परिसरात फिरत असल्याचे समोर आल्यावर या परिसरात पथकाने सापळा लावला. दुसऱ्या दिवशी अर्थात १९ तारखेला संशयित आरोपी अलगद अडकले. पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्याची कबुली देताच त्यांना अटक केले .न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी फर्माविल्यावर अधिक कठोर पणे चौकशी केली असता संशयित आरोपीं पैकी उदाणी याने महात्मा फुले पोलीस चौकी कल्याण वाय डी पोलीस ठाणे मध्यप्रदेश, कोथरूड पोलीस ठाणे पुणे, आणि कल्याण पोलीस ठाणे अंतर्गत वाहन चोरीचे गुन्हे कबुल केले आहेत.