नवी मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवातही जलप्रदूषण टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका १३९ कृत्रिम तलाव तयार करणार आहे. कृत्रिम तलावांच्या जागा परिमंडळ व अभियांत्रिकी विभागामार्फत निश्चित करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे पारंपारिक २२ व कृत्रिम १३९ अशा १६१ विसर्जन स्थळांवर श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्याच्या प्राथमिक तयारीला पालिका प्रशासन लागले आहे.
तलावातील जलप्रदूषण रोखण्यासाठी पालिकेच्या १४ मुख्य तलावातील जलाशयाच्या साधारणत: ३० टक्के भागात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत गॅबियन वॉल उभारण्यात आल्या असून या विशिष्ट क्षेत्रात नागरिकांनी श्रीमूर्ती विसर्जन करावे आणि जलप्रदूषण रोखावे असे आवाहन पालिकेने केले आहे.त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे मंडळांना आवाहन करताना श्रीगणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळ विसर्जनस्थळे उपलब्ध व्हावीत याची खबरदारी घेत मोठया प्रमाणावर कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या नियंत्रणाखाली आठही विभागांमध्ये मध्यवर्ती ठिकाणी नागरिकांची मागणी व मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. पालिकेकडून १३९ कृत्रिम तलाव बनविण्यात येणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २२ पारंपारिक विर्सजन स्थळे असून त्याठिकाणी होणारी भाविकांची गर्दी विभागली जावी व एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये याकरीता गेल्या ६ वर्षांपासून कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात येत आहे. या कृत्रिम तलावांना नागरिकांचा दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गतवर्षी कृत्रिम तलावात १४ हजारापेक्षा अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करून नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या पर्यावरण विषयक जागरुकतेचा प्रत्यय दिला होता.
विभागवार कृत्रिम तलावांची संख्या
बेलापूर- १९
नेरुळ- २६
वाशी- १६
तुर्भे- २०
कोपरखैरणे-१५
घणसोली- १६
ऐरोली- १८
दिघा- ९
एकूण – १३९