नवी मुंबई – नवी मुंबईतील लोटस तलावाच्या ठिकाणी सिडकोकडून मनमानी करत लोटस तलाव बुजवण्यासाठी तलावात १०० ट्रक भराव टाकण्याचे काम सिडकोने केले आहे. परंतू लोटस तलाव वाचवणारच तो बिलडरांच्या घशात जाऊ देणार नाही. पर्यावरणप्रेमी यांनी लोटस तलावाभोवती सिडकोविरोधात सलग चौथ्या रविवारी घोषणा देत लोटस तलाव वाचवण्यासाठी न्यायालयातही सक्षमतेने आरपारची लढाई लढण्यास तयार असल्याचा निर्धार रविवारी ( ता .२९) व्यक्त केला.
पर्यावरणाचा घात करणाऱ्या सिडकोला आता नवी मुंबईतून हद्दपार करण्याची वेळ आली असल्याचा राग पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला .तसेच सिडको विरोधात तलावा भोवती पर्यावरणप्रेमींनी वॉकेथॉन करत आता सिडको विरोधात रस्त्यावरची लढाई लढत असताना न्यायालयातही सक्षमतेने लढा देण्यास सज्ज राहणार असल्याची माहिती नव्याने याचिका करणाऱ्या याचिकाकर्ते सुनील अग्रवाल यांनी पर्यावरण प्रेमींना दिली.
सिडकोच्या पर्यावरण नष्ट करण्याच्या कृती विरोधात व लोटस तलाव वाचवण्यासाठी सलग ४ आठवडे रविवारी विविध पर्यावरणप्रेमी सामाजिक संघटना,नागरीक, लोकप्रतिनिधी सकाळी ८.३० वाजता एकत्र येत लोटस तलाव वाचवण्याचा निर्धार करत आहेत.
‘पर्यावरण टिकवा ,लोटस लेक वाचवा’ अशा घोषणा देत रस्त्यावरील व कायदेशीर लढाई अखेरपर्यंत लढण्याचा निर्धार मोठ्या प्रमाणात उपस्थित पर्यावरण प्रेमींनी केला. तर दुसरीकडे विष्णुदास भावे नाट्यगृह येथे झालेल्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारातही आपण लोटस त्याला वाचवण्याचे आवाहन नाईक यांना केले असल्याची माहिती माझी स्थानिक नगरसेविका सलुजा सुतार यांनी उपस्थित पर्यावरण प्रेमी व नागरिकांना दिली. त्याप्रमाणे वनमंत्री नाईक यांनी उपस्थित सिडको अधिकाऱ्यांना या तलावा टाकलेला भराव ८ दिवसात काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत याची माहिती आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पर्यावरण प्रेमींना दिली.
आज रविवारी सेव्ह नवी मुंबई एन्हवायरमेंट,मॅंग्रोज सोल्जर,सजग नागरीक मंच, सेव्ह लोटस लेक, सीवूड्स दारावे मित्र मंडळ, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, वकील यांच्यासह विविध पर्यावरणप्रेमी लोटस तलाव वाचवण्यासाठी व पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी सीवूड्स सेक्टर २७ येथील लोटस तलाव येथे एकत्र आले होते.