नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ परिसरात बिवलकर कुटुंबीयांसाठी ५४ हजार चौरस मीटरच्या भूखंड वाटपाचे इरादापत्र तयार करणाऱ्या सिडको प्रशासनाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेले घोटाळ्याचे आरोप ताजे असतानाच मंगळवारी स्वत: यशवंत बिवलकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. नवी मुंबईतील तथाकथित बिल्डर, प्रसारमाध्यमाचे काही प्रतिनिधी, सिडकोच्या आणि विशेषत: वतनाच्या, इनामात मिळालेल्या जमिनीवर डोळा ठेवून काम करणारी एक मोठी टोळी नवी मुंबईत कार्यरत असून या प्रकरणी राज्य सरकारने विशेष चौकशी समिती नेमावी अशी मागणी बिवलकर यांनी केली.

आमदार रोहित पवार यांनी केलेले आरोप हे याच टोळीकडून पुरविलेल्या खोट्या माहितीवर आधारित असून आमच्या वारसदारांना मिळणारी हक्काची जमीन लाटण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. ही मंडळी पनवेल, उरण पट्ट्यातील काही राजकीय नेते तसेच दलालांच्या सातत्याने संपर्कात असतात, असेही बिवलकर या वेळी म्हणाले.

आमदार रोहित पवार ज्या बिल्डरांचे ऐकून आमच्यावर आरोप करतात त्या बिल्डरविरोधात वेगवेगळ्या प्रकरणांत १२ गुन्हे दाखल आहेत, असेही बिवलकर म्हणाले. यशवंत बिवलकर आणि त्यांचे वकील तनवीर निजाम यांनी नवी मुंबईतील तुंगा हॉटेल येथे पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील आपली भूमिका पहिल्यादाच स्पष्ट केली. गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईतील बिल्डर उन्मेश उदाणी, के. कुमार नामक तथाकथित स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कँग्रेसच्या महिला पदाधिकारी भावना घाणेकर यांनी एकत्र येऊन आपल्याला वतनाद्वारे मिळालेली ही जमीन रोखण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा आरोप बिवलकर आणि त्यांच्या वकिलांनी केला.

बिवलकर यांच्यावर आमदार पवार यांनी ब्रिटिशांची लाचारी करून जमीन इनामात मिळविल्याचा आरोप केला होता. यावर बिवलकर यांनी स्पष्टीकरण देताना त्यांची ही सातवी पिढी असून रघुजी आंग्रे यांच्या संस्थानामध्ये विनायक बिवलकर हे दिवाण असल्याने त्यांनी संस्थान सांभाळल्याने ही जमीन त्यांना इनामात मिळाली. ब्रिटिशांच्या राजवटीत १९३६ ही जमीन परत मिळविण्यासाठी लंडनपर्यंत न्यायालयीन लढाई लढून ही जमीन परत मिळविल्याचा दावा यशवंत बिवलकर यांनी मंगळवारी केला.

न्यायालयीन लढाई सुरूच

सर्वोच्च न्यायालयात या जमिनीपैकी एका प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालाच्या आधारे १९९४ ते २०२३ या काळात राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर बिवलकर यांच्या वारसदारांना या जमिनीचा काही भाग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात संपादित झाला आहे. त्याची नुकसानभरपाई मिळविताना हा त्रास संबंधितांकडून दिला जात आहे, असा आरोप यशवंत बिवलकर यांनी केला.

प्रसारमाध्यमातील एका पत्रकाराने सिडको मंडळातून जमिनीच्या वारसदार आणि त्या जमिनीची महसुली माहिती गोळा करून काही स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना द्यायची त्यानंतर माहिती अधिकार कायद्याचा वापर करायचा आणि राजकीय हस्तक्षेप करून या प्रकरणात घोटाळा झाल्याचे चित्र उभे करून स्वत:च ही जमीन लाटण्याचा प्रयत्न करायचा असा हा खेळ आहे, असा आरोपही त्यांनी केला. संबंधित जमिनीबाबत नवीन वाद प्रशासकीय दरबारी निर्माण झाल्यानंतर त्या मूळ लाभार्थ्याकडे इतर विकासकांना पाठवून त्या जमिनीचे वादीत प्रकरण मिटविण्यासाठी तडजोड करण्यासाठी ऑफर द्यायची अशी ही टोळी सक्रिय असल्याचा आरोप बिवलकर आणि त्यांच्या वकिलांनी केला.

बिवलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्याविरोधात लावलेल्या कोणत्याही आरोपात तथ्य नाही. खोट्या आणि निरर्थक टिप्पणीबद्दल त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. आजपर्यंत माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. श्रीमती भारती पवार या आंग्रे संस्थानच्या वंशज आहेत. पवार यांचा न्यायालयीन वाद सुरू आहे. या लढ्यात त्या नक्कीच जिंकतील. बिवलकर कुटुंबीयांनी संबंधित जमिनीचे सर्व फायदे आंग्रे कुटुंबीयांना दिले पाहिजेत. – उन्मेश उदाणी, विकासक, नवी मुंबई

प्रकल्पग्रस्तांना त्यांचे हक्काचे भूखंड मिळत नसताना सिडको बिवलकर यांच्यासाठी फारच आग्रही दिसते. हजारो रुपयांच्या भूखंडाच्या फाइलवर एका दिवसात ४० पेक्षा अधिक स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आम्ही राज्याच्या मुख्य सचिवांकडे १२ हजार पाणी तक्रार अर्जांची प्रत दिली. मंगळवारच्या पत्रकार परिषदेत त्यासंबंधित तक्रारीवर उत्तर देण्याऐवजी बिवलकर हे आमचे वैयक्तिक फोटो झळकवून लक्ष विचलित करत आहेत. आम्हाला टोळी म्हणून हिणवत आहेत. प्रकल्पग्रस्तांसाठी आम्ही लढत राहणार. – भावना घाणेकर, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरद पवार गट)