उरण : उरण किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप सुरू आहे. नागाव ते केगाव दरम्यान किनारपट्टीची दुरवस्था थांबविण्यासाठी १० कोटींपेक्षा अधिक रुपये खर्चून बंधारा बांधण्यात आला. मात्र पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावरील या बंधाऱ्याचे दगड पुन्हा एकदा निखळू लागल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई रायगड जिल्ह्यातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असलेल्या उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावरील पर्यटकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. सुट्टीच्या दिवशी तर प्रचंड गर्दी होत आहे. त्याचप्रमाणे या किनाऱ्यावर ओएनजीसीसारखा महत्त्वाचा तेल शुद्धीकरण प्रकल्प व नागावमधील लोकवस्ती आहे. मागील अनेक वर्षांत पावसाळ्यात येणाऱ्या समुद्राच्या प्रचंड लाटांमुळे पिरवाडी किनाऱ्यावरील धूप वाढली होती. सध्या मात्र पावसाळ्यात येणाऱ्या ५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या समुद्राच्या महाकाय लाटांमुळे पिरवाडी किनारा पुन्हा उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

किनाऱ्यावरील शेकडो वर्षांची नारळी, पोफळीची वृक्ष उखडून निघत होती. त्याचप्रमाणे समुद्राचे पाणी किनाऱ्यावरील नागाव परिसरात शिरत होते. परिणामी, येथील विहिरीतील पिण्याचे पाणी व शेतीतही समुद्राचे खारे पाणी येऊ लागल्याने समस्या निर्माण झाली होती. ही समस्या दूर करण्यासाठी पिरवाडी किनाऱ्यावरील बंदिस्ती मजबूत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. याची दखल घेत सार्वजनिक बांधकामच्या किनारा विभागाने या किनाऱ्यावरील मजबुतीसाठी मोठमोठे दगड किनाऱ्यावर टाकून बंदिस्ती केली आहे. मात्र यातील अनेक दगड हळूहळू निखळू लागले आहेत.

पर्यटकांना सतर्कतेचे आवाहन

नागाव परिसरातील शेती आणि पाण्याच्या विहिरीत खारे पाणी जाऊन नागरिकांच्या आरोग्याचा धोका संभवत असल्याचे मत नागावमधील सामाजिक कार्यकर्ते काका पाटील यांनी व्यक्त केले आहे. तर येथे येणाऱ्या पर्यटकांनाही सतर्कतेचे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे. अनेक पर्यटक समुद्रात उतरून समुद्राच्या लाटांचा आंनद घेतात. त्यावेळी एखादा दगड सरकून आल्यास अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
पिरवाडी किनाऱ्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटक आणि स्थानिक नागरिकांसाठी या किनाऱ्याच्या विकासाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून ३० कोटींचा निधी मिळाला आहे. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून किनाऱ्यावर बाग, चालण्यासाठी मार्ग, व्यायाम साहित्य, वाहनतळ व इतर सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे पिरवाडी किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे.