नवी मुंबई : मुलुंड ऐरोली मार्गावर गाडीला गाडी घासून किरकोळ अपघात झाला होता. यात सिमेंट मिक्सर गाडी चालकाचे अपहरण निलंबित सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडेकर आणि वाहन चालक प्रफुल्ल साळुंके यांनी केले होते. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यावर तपासाची सूत्र फिरली.

२० तारखेला प्रफुल्ल साळुंके याला धुळे येथे अटक केले होते. मात्र दिलीप खेडकर आणि संशयित आरोपींना साहाय्य करणे, पुरावे नष्ट करणे प्रकरणी सह आरोपी असलेली दिलीप खेडकर यांची पत्नी मनोरमा अद्याप फरार आहे. दोघांच्या विरोधात नवी मुंबई पोलिसांनी लूक आउट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

वादग्रस्त निलंबित सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई वडिलांचा एक प्रताप नवी मुंबईत समोर आला होता. १३ तारखेला मुलुंड ऐरोली मार्गांवर सिमेंट मिक्सर गाडी आणि एका कारचा किरकोळ अपघात झाला होता. कार चालक प्रफुल्ल आणि खेडकर यांनी कारची नुकसान भरपाई दिली नाही म्हणून मिक्सर चालक प्रल्हादकुमार चौहान याचे अपहरण करून पुणे येथील औंध येथील बंगल्यात डांबून ठेवले होते.

या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच रबाळे पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने शोध घेत खेडकर यांच्या घरी पोहचले. तेथे अपहृत चौहान याची सुटका करण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी खेडकर याची पत्नी मनोरमा हिने पोलिसांना घरात येऊ दिले नाहीच शिवाय अंगावर कुत्रे सोडले. रबाळे पोलिसांनी या प्रकरणी फिर्याद दाखल करीत चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

त्यामुळे या प्रकरणी पुण्यातील चतुःशृंगी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. रबाळे पोलिसांनी तिला सह आरोपी केले होते. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे यांचे पथकाने तांत्रिक तपास व गोपनीय खबरीनें दिलेल्या माहिती वरून संशयित आरोपी प्रफुल्ल ज्ञानेश्वर सांळुखे यास धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथुन अटक केली होती. मात्र दिलीप खेडकर आणि त्याची पत्नी मनोरमा हे पोलिसांना गुंगारा देण्यात यशश्वी झाले. त्यांना नवी मुंबई पोलिसांनी फरार घोषित करीत त्यांच्या विरोधात लूक आउट नोटीस जारी केली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली आहे.