नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले उड्डाण डिसेंबर महिन्यात व्हावे यासाठी सिडको तसेच राज्य सरकारच्या स्तरावर हालचालींना वेग आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत विमानतळाच्या नामकरणाचे नेमके काय करायचे याविषयी अतिशय सावध पावले उचलली जात आहेत. विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांनी येत्या आठवड्यापासून आंदोलनाची हाक दिली आहे. म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली येत्या १४ सप्टेंबर रोजी चारचाकी वाहनांची रॅली काढण्यात येणार आहे.

नवी मुंबई विमानतळावरून डिसेंबर महिन्यात पहिले उड्डाण व्हावे यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (डीजीसीए) पुढील महिन्यात या विमानतळाचा ताबा देण्याची प्रक्रिया पूर्ण व्हावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून सिडको तसेच राज्य सरकारच्या स्तरावर हालचालींना वेग आला आहे. येत्या महिनाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे रीतसर उद्घाटन करून ही प्रक्रिया पूर्ण करता येईल का याची चाचपणी सध्या सुरू असली तरी या संपूर्ण प्रक्रियेत विमानतळाच्या नामकरणाचे नेमके काय करायचे याविषयी अतिशय सावध पावले उचलली जात आहेत.

प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि.बा.पाटील यांचे नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास द्यावे यासाठी नवी मुंबईच नव्हे तर संपूर्ण ठाणे, रायगड जिल्ह्यातील आगरी-कोळी समाज आग्रही आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाचे उद्घाटन करण्यापूर्वी नामकरणाचा तिढा केंद्र सरकारच्या स्तरावर सुटेल का याविषयी येथील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वेगवेगळे तर्क लढविले जात असून या मुद्दयावरून एकेकाळी आक्रमक असलेले सत्ताधारी भाजपचे नेतेही चिंताग्रस्त दिसू लागल्याचे वृत्त आहे.

सुरेश म्हात्रे हे आगरी समाजातून येतात. विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा ठाणे, भिवंडी, कल्याण या भागातही आक्रमकपणे मांडला जावा यासाठी महाविकास आघाडीच्या विविध घटकांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे माजी आमदार राजू पाटील यांनीही या मुद्दयावरून स्थानिक पातळीवर बैठका सुरू केल्या आहेत. येत्या महिनाभरात विमानतळाचे उद्घाटन होत असेलच तर त्यापूर्वी नामकरणाचा तिढा सोडवा अशी मागणी ही मंडळी करत आहेत. नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात नुकतीच आगरी-कोळी प्रकल्पग्रस्त समाजाची या मुद्द्यावर एक बैठक घेण्यात आली. पनवेल, उरण, नवी मुंबई परिसरातील चारही विधानसभा मतदारसंघांत भाजपचे आमदार निवडून आले आहेत. या आमदारांनी दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळासाठी जाहीर होत नाही तोवर उद्घाटन होऊ देणार नाही अशी भूमिका घ्यावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आल्याचे समजते.

भाजपसाठी परीक्षेचा काळ

  • राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे असा प्रस्ताव पुढे आणला होता.
  • शिंदे यांच्या पत्रानंतर ठाणे, रायगड जिल्ह्यात आगरी-कोळी प्रकल्पग्रस्त समाजात हा मुद्दा तापू लागला. भाजपचे या संपूर्ण पट्टयातील नेते यासाठी अग्रभागी होते. पुढे शिंदे यांनी बंड केले आणि ते मुख्यमंत्री झाले.
  • उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आमदारांचे बंड झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळास देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पुढे शिंदे यांनीही अशा स्वरूपाचा स्वतंत्र प्रस्ताव मंजूर करून घेतला.
  • राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्राच्या मंजुरीसाठी पाठविला असला तरी मागील तीन वर्षांत यावर निकाल लागलेला नाही. या मुद्द्यावरून आगरी-कोळी समाजात तीव्र भावना आहेत. त्यामुळे विमानतळ उद्घाटनाचा मुर्हूत जवळ येऊ लागताच पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा तापू लागला आहे.

या मागणीसाठी रविवारी भिवंडी ते उरण येथील जासई या दि.बा.पाटील यांची कर्मभूमी राहिलेल्या गावापर्यंत कार रॅली काढली जाणार आहे. ठाणे, रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र या रॅलीत सहभागी होतील. गेल्या काही दिवसांपासून आम्ही या रॅलीच्या तयारीसाठी बैठका घेत आहोत. त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळास दिल्याशिवाय उद्घाटन करणे ही भूमिपुत्रांची फसवणूक ठरेल. – सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे, खासदार, भिवंडी

भिवंडीकरांची रॅली

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त भिवंडीकरांच्या वतीने भव्य चारचाकी वाहनांची रॅली आयोजित करण्यात आली आहे. ही रॅली भिवंडीवरून ठाणे ते नवी मुंबई मार्गे विमानतळ परिसरात पोहोचून जासई गावात या रॅलीचा समारोप होणार आहे. या ताफ्यात दोन हजारांहून अधिक चारचाकी वाहनांचा समावेश होणार असून, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई व मुंबई या जिल्ह्यांतून हजारोंच्या संख्येने भूमिपुत्र सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.