नवी मुंबई: नेरुळ येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडिमवर शनिवार, ३ मे रोजी सायंकाळी संगीतकार ए आर रेहमान यांचा संगीत कार्यक्रम असल्याने प्रेक्षकांची संभाव्य गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शीव-पनवेल मार्गावर वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
कार्यक्रमात सहभागी कलावंत व महत्वांच्या व्यक्तीं येणार आहेत. त्यांना कुठलाही अडथळा होऊ नये, तसेच त्यांची सुरक्षा पाहता स्टेडियम प्रवेशद्वार समोरील सेवा रस्ता राखीव ठेवण्यात आला आहे.
सेवा रस्ता राखीव ठेवण्यात आल्याने अन्य वाहनांना प्रवेश बंदी लागू केली आहे. तीन तारखेला सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत ही प्रवेश बंदी असणार आहे. तसेच एल पी सिग्नल डी वाय पाटील विद्यापिठ गेट – छ शिवाजी चौक – शनिमंदिर कमान – डी वाय पाटील रुग्णालय प्रवेशद्वार पासून शनिमंदिर – आर आर पाटील उदयान- पारिजात जिम चौक -भिमाशंकर सोसायटी पर्यंत वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. याला पर्यायी मार्ग शीव पनवेल मार्गांवरील उरण फाटा ते एल. पी. उड्डाणपूलमार्गे इच्छित स्थळी जाता जातील.
शीव-पनवेल मार्गावरील पुणे दिशेच्या सेवा मार्गावर हायड्रेलिया कंपनीपासून शिरवणे बोगदा (उजवे वळण न घेता) शिवाजीनगर – एल पी पुलापासून उजवे वळण न घेता सरळ पुण्यनगरी जंक्शन-उरणफाटा ब्रिज सिग्नल पर्यंत सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास मनाई करण्यात येत आहे. याला पर्यायी मार्ग देण्यात आला असून तुर्भे एमआयडीसीकडून येणारी वाहने पुण्यनगरीकडून उरणफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच हायड्रीलिया कंपनीकडून येणारी वाहने सरळ शिरवणे बोगदा उजवे वळण न घेता शिवाजीनगर – एलपी सिग्नल उजवे वळण न घेता सरळ पुण्यनगरी उरणफाटा पुलाखालून इच्छित स्थळी जातील.