किलोमागे सात रुपयांपर्यंत दरवाढीची नोंद

नवी मुंबई</strong> : पावसाळी कांदा अद्याप बाजारात आला नाही व साठवणुकीतील कांद्याची प्रतवारी खराब असल्याने गेले काही दिवस स्थिर असलेले कांद्याचे दर वाढू लागले आहेत. गुरुवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा-बटाटा बाजारात किलोमागे तीन ते सात रुपयांची दरवाढ झाली आहे.

गेल्या वर्षीही गणेशोत्सवानंतर कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. लांबलेल्या पावसाने कांद्याच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे घाऊक बाजारात १२० ते १५० पर्यंत प्रतिकिलोचा दर गेला होता.

यावर्षी अद्याप पावसाळा सुरू असला तरी कांद्याचे दर स्थिर होते. करोनाकाळातही कांदा स्वस्त मिळत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. परंतु काही दिवसांपासून कांद्याच्या दरात चढ-उतार पाहावयास मिळत आहेत.

गुरुवारी घाऊक बाजारात कांद्याची दरवाढ झाली आहे. नियमित ६०गाडी होणारी कांद्याची आवक कमी होऊन ती चाळीस गाडय़ांपर्यंत झाली. आवक कमी झाल्याने त्याचा दरावरही परिणाम झाला. प्रतवारीनुसार ३ ते ७ रुपयांची कांदा दरात वाढ झाली आहे. १७ ते १९ रुपयांचे प्रतिकिलोचे दर १९ ते २३ रुपयांपर्यंत होते. नाशिक, नगर, पुणे येथून कांदा आवक सुरू आहे. दिवाळीपर्यंत दर आणखी वाढतील अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

सीताफळाची मागणी रोडावली

नवी मुंबई : सध्या सिताफळाचा हंगाम सुरू असताना करोनामुळे मागणी कमी झाली आहे.ऑगस्टमध्ये सर्वाधिक मागणी असते, मात्र सध्या  ३५ ते ४० टक्केच मागणी आहे.

जुलै ते नोव्हेंबरअखेपर्यंत एपीएमसी बाजारात सीताफळाचा हंगाम सुरू असतो. बाजारात गावठी सीताफळ  दाखल होत असून पुणे, शिरूर, जळगाव, नगर येथून ८ ते १५ टेम्पो आवक होत आहे. मुंबई उपनगरात सीताफळला अधिक मागणी असते. सध्या करोना प्रादुर्भावामुळे फेरीवाले बसत नसल्याने मागणी कमी झाली आहे. सीताफळ खाल्याने सर्दीचे होत असल्याच्याही तक्रारी आहेत, असे  फळ व्यापारी संजय पिंपळे यांनी सांगितले. सध्या बाजारात सीताफळाला प्रतवारीनुसार प्रतिकिलोला ६० ते ८० व  ८० ते १२० रुपये बाजारभाव आहे.

गणेशोत्सवानंतर कांद्याची दरवाढ होत आहे. पावसाळी कांदा बाजारात अद्याप आलेला नाही. साठवणुकीचा कांदा खराब झाला आहे. त्यामुळे आवक कमी होत कांद्याचा तुडवडा भासत असून दरात वाढ होत आहे. दिवाळीपर्यंत कांदा पन्नाशी गाठेल.

-दिगंबर राऊत, व्यापारी, कांदा-बटाटा बाजार समिती