पनवेल : पनवेल रेल्वे स्थानकासमोरील झोपडपट्टीतून शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बाळ चोरीस गेल्याने पोलीस तपास करत होते. बाळाला चोरलेल्या महिलेने पनवेल ते पुणे असा रेल्वे प्रवास करुन पोलिसांना चकवले. अखेर हे बाळ कळंबोली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक महिला अधिका-याच्या नजरेस दिसले आणि बाळाला सुखरुप आईपर्यंत पोलिसांनी पोहचवले.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे स्थानकासमोरील झोपडपट्टीत राहणारी २५ वर्षीय देवचना भोसले या शुक्रवारी त्यांचे तीन महिन्यांच्या बाळाला घेऊन झोपले असताना शेजारी राहणाऱी रोशनी विनोद वाघेश्री हीने बाळ पळवले. पोलीस अधिकारी ठाकरे यांनी याबाबत गुन्हा नोंद केल्यावर बाळाच्या शोधासाठी पाच पोलीस पथके नेमली. संशयीत महिला रेल्वे स्थानकातून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेत बसल्याचे समजल्यावर पोलीसांच्या विविध पथकांनी लोणावळा, दौंड, कर्जत व पुणे येथे जाऊन महिलेचा शोध घेतला.
मात्र पोलिसांना गुंगारा देऊन संशयीत महिला कळंबोलीत परतली. या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती शेळके यांना कळंबोली अग्निशमन दलाच्या इमारतीकडे ही महिला बाळासह दिसली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके यांनी महिलेची चौकशी केल्यावर त्या महिलेने हे बाळ तीचे नसल्याचे कबूल केले. अखेर या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती कळंबोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी पनवेल शहर पोलिसांना कळवली. सर्व कायदेशीर सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बाळाला त्याच्या आईच्या स्वाधीन शनिवारी करण्यात आले. या महिलेने हे बाळ का चोरले याचा तपास पोलीस करीत आहेत.