पनवेल – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अन्यथा इतर नाव खपवून घेतले जाणार नाही असा इशारा बुधवारी पनवेल महापालिकेला दिल्यानंतर काही मिनिटांतच मनसेच्या कार्यकर्त्यांनी नवीन पनवेल येथे पालिकेने उभारलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या दिशादर्शक फलकावर काळे फासून संताप व्यक्त केला.
या घटनेनंतर पनवेल महापालिका आणि पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणी बुधवारी अनोळखी चार ते पाच तरूणांची ओळख न पटल्याने त्यांच्यावर शासकीय मालमत्तेचे नूकसान करून विदृपीकरण केल्याने गुन्हा नोंदवला आहे.
पनवेलमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शेकापच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर पनवेलमधील महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये आक्रमकता वाढल्याचे चित्र आहे. मनसेने यामध्ये पुढाकार घेतला आहे. राज ठाकरे यांच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड या राजधानीत लेडीज सर्व्हीस बारविषयी चिंता व्यक्त केली होती.
त्याच रात्री पनवेल (कोन) येथील लेडीज सर्व्हीस बारच्या बाहेर तोडफोड करून मनसेच्या पदाधिका-यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. या घटनेनंतर मनसेच्या पदाधिका-यांसोबत साथीला साथ देण्यासाठी शेकापचे पदाधिकारी पोलीस ठाणे ते न्यायालयापर्यंत उपस्थित होते.
तसेच महाविकास आघाडीने बुधवारी पनवेल महापालिकेवर काढलेल्या मोर्चातही मनसेचे पनवेलचे स्थानिक नेते योगेश चिले यांनी जोरदार भाषणबाजी करून सर्वांचे लक्ष्य वेधले. चिले यांच्या भाषणात पालिका प्रशासन आणि भाजपचे स्थानिक आ. प्रशांत ठाकूर यांच्यावर संगणमत करून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. यामुळे बुधवारच्या आघाडीच्या मोर्चात सर्वाधिक चर्चा चिले यांच्या भाषणाची झाली. तसेच चिले यांनी त्यांच्या भाषणात पनवेल महापालिकेला इशारा देताना दि. बा. पाटील यांच्या नावा ऐवजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे दिशादर्शक फलक पुढील १० दिवसात काढून घ्या, अन्यथा मनसे असे सर्व फलक काढून टाकेल असा इशारा दिला होता.
दि. बा. पाटील यांच्या नामकरणासाठी सुरू असलेल्या लढ्यात आता यापूढे मनसे सुद्धा आक्रमक झाल्याचे दिसत आहे. पनवेलच्या राजकारणात महाविकास आघाडीने मनसेला गेल्या महिन्याभरापासून मानाचे ताट दिल्यामुळे पनवेलच्या राजकीरण गणितामध्ये हिशोबात मोडत नसलेल्या मनसे पक्षाला बेरजेचे महत्व मिळाल्याची चर्चा आहे.
या दरम्यान सरकारी मालमत्तेचे नूकसान केल्यामुळे खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्याकडे बुधवारी पनवेल महापालिकेच्या कर्मचा-यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ४ ते ५ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आदई व एचडीएफसी सर्कल या मार्गावरील महापालिकेने उभारलेल्या दिशादर्शकाला काळे फासल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांवर अजून एका गुन्ह्याची नोंद झाली आहे.