पनवेल – पनवेल महापालिकेतील खड्यांमुळे मागील काही दिवसांमध्ये पनवेल महापालिका प्रशासनावर जोरदार टीका होत आहे. रस्ते बांधणीच्या विकास कामांची कंत्राट लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांच्या कंपन्यांना मिळू लागल्याने हा विषय सर्वाधिक चर्चेचा बनला. महापालिका आयुक्तांनी पालिकेतील कारभार पारदर्शक असल्याचे स्पष्ट करताना संबंधित रस्त्यांची कामे करणा-या कंपन्यांनी केलेल्या कामांची चौकशी करण्यासाठी अतिरीक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.

तसेच चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत संबंधित कंपन्यांना कोणतीही भरपाई न देता कंपन्यांनीच खर्च करून पुन्हा खड्डे पडलेले रस्त्यांवर डांबरीकरण तातडीने करण्याचे फर्मान सोडले. याच आदेशाची दखल घेऊन ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर कडक उन पडल्यामुळे कंत्राटदार कंपन्यांनी सुद्धा खारघर येथील सेक्टर ३५ मधील रस्त्यांवर पुन्हा डांबरीकरणाचे काम सुरू केले. मंगळवारी सायंकाळी डांबरीकरण केलेला हा रस्ता पुन्हा पाण्याखाली गेल्याने महापालिका आणि कंत्राटदारांच्या विकासकामांवर पावसाचे पाणी फीरल्याची चर्चा शहरभर सुरू होती. 

खारघर येथील सेक्टर ३५ मधील रस्त्यावर मंगळवारी सकाळपासून  दिवसभर डांबरीकरणाचे काम सायंकाळी पुर्ण झाले. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सूमारास पडलेल्या वारा आणि धोधो पावसामुळे पुन्हा डांबरीकरणात पाणी शिरले. डांबरामध्ये पाणी मिश्रण झाल्याने पुन्हा डांबरीकरणाचा रस्त्यावर खड्डे पडणार हे निश्चित झाले आहे. 

महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी नवीन बांधलेल्या तसेच डांबरीकरण केलेल्या रस्त्यांवर खड्डे का पडले यासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल येण्यापूर्वीच पावसाने पुन्हा घोळ घातल्यामुळे नैसर्गिक आपत्तीत टिकणारे रस्ते बांधण्याचा नवा प्रयोग महापालिकेला यापुढे करावा लागणार आहे.

महापालिकेतील रस्त्यांचे कंत्राट आ. प्रशांत ठाकूर यांच्या कुटूंबियांच्या कंपन्यांना आणि माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या कुटूंबियांच्या कंपन्यांना मिळाल्यामुळे खारघर फोरम या सामाजिक संस्थेने महापालिकेच्या कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. 
विशेष म्हणजे मे महिन्यात या रस्त्यांची कामे सुरू असताना सुद्धा अवकाळी पावसातच या रस्त्यांची कामे झाल्यामुळे खड्यांची आपत्ती पनवेलकरांवर ओढावली असेही सांगीतले जात आहे.