उद्योगविश्व : कागदी खोक्यातील ‘पाटीलकी’

पेपर उद्योगजगतात गुजराती, मारवाडी समाजातील उद्योजकांची मक्तेदारी मानली जाते.

दिलीप पाटील

 

फायझर, सीमेन्स, इन्डोफार्मा, गार्गी यांसारख्या कंपन्यांना त्यांचा माल परदेशात पाठविण्यासाठी हवाबंद खोक्यांची आवश्यकता भासते. ते खोके बनविण्याचे काम पाटील यांची पेपर पॅकही कंपनी करते.

नवी मुंबई शहर प्रकल्पात जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना सिडकोकडून मिळालेल्या साडेबारा टक्के योजनेतील भूखंड विकून हाती पडलेल्या पैशाची बहुतांशी प्रकल्पग्रस्त दौलतजादा करीत असताना ३५ वर्षांपूर्वी तुर्भे येथील चार भावांनी उद्योजक बनण्याचा ध्यास घेऊन पेपर उद्योगात प्रगती केली. आज त्यांच्या नवी मुंबईतील औद्योगिक वसाहतीत पाच कारखाने आहेत. त्यात नवी मुंबईत दोन खोके बनविण्याची फॅक्टरी चालविणाऱ्या दिलीप पाटील यांनी निर्यातीसाठी लागणाऱ्या खोक्यात जम बसविला आहे. त्यामुळेच आखाती देश आणि दक्षिण आफ्रिकेत पाटील यांच्या ‘पेपर पॅक इंड्रस्ट्रिज’चा बोलबाला आहे. पाटील सीमेन्स कंपनीला लागणारे सर्व प्रकारचे बॉक्सचा पुरवठा करीत आहेत. पाटील यांनी शिरवणे येथील एक एकरवरील कारखान्यात विविध प्रकारच्या खोक्यांची निर्मिती करीत आहे.

पेपर उद्योगजगतात गुजराती, मारवाडी समाजातील उद्योजकांची मक्तेदारी मानली जाते. त्यामुळे ८० च्या दशकात या उद्योगात पाऊल ठेवणे तसे जोखमीचे होते; मात्र पाटील यांचे मोठे बंधू भालचंद्र पाटील यांनी कागदापासून बनविण्यात येणाऱ्या खोक्यांचे देवनार येथे जाऊन प्रशिक्षण घेतले. त्यावेळी ठाणे-बेलापूर पट्टीत सुरू झालेल्या ‘फायझर’ कंपनीला पुठ्ठय़ाच्या खोक्यांची मोठी गरज होती. तुर्भेतील शिक्षणमहर्षी दादा सामंत यांच्या शब्दाला या परिसरात एक वजन होते. सामंत यांच्या सान्निध्यात लहानाचे मोठे झालेल्या पाटील बंधूंना खोके बनविण्याचे ‘फायझर’मधील काम दादांनी कुटुंबाला मिळवून दिले. त्यामुळे एका लघुउद्योजकाचा जन्म तुर्भे येथील छोटय़ाशा जागेत झाला. केवळ याच उद्योगावर आज या कुटुंबाचे पाच कारखाने आहेत.

फायझर, सीमेन्स, इन्डोफार्मा, गार्गी यांसारख्या कंपन्यांना त्यांचा माल परदेशात पाठविण्यासाठी हवाबंद खोक्यांची आवश्यकता भासते. ते खोके बनविण्याचे काम पाटील यांची ‘पेपर पॅक’ ही कंपनी करते. दिवसाला १५ ते २० हजार खोके पाटील यांच्या कारखान्यात बनविले जातात. ही क्षमता दहा लाख खोक्यांची आहे. तशी अद्यावत यंत्रणा कारखान्यात बसविलेल्या आहेत. ३३ कामगारांच्या बळावर रात्रंदिवस हा कारखाना सुरू  आहे.

खोके बनविताना घ्याव्या लागणाऱ्या काळजीचा एक किस्सा पाटील सांगतात. सीमेन्स कंपनीच्या वतीने काही इलेक्ट्रिक साहित्य पाटील यांच्या खोक्यात बंद करून अमेरिकेत पाठविण्यात आले होते. अमेरिकेला जाईस्तोवर या खोक्यांना समुद्रमार्गे दीड ते दोन महिने लागले. तेथे गेल्यानंतर इलेक्ट्रिक साहित्याचा तो कंटेनर उघडण्यात आल्यावर कंटेनरमधून मोठय़ा प्रमाणात कोळी (स्पायडर) बाहेर पडल्याने ते सर्व साहित्य अमेरिकन कंपनीने रद्द करून परत पाठवले. त्यावेळी पेपर पॅकच्या खोक्यातून हे कोळी तेथे गेले का याची चौकशी करण्यात आली. पण पाटील यांच्या खोके उत्पादनात तसे काहीच आढळून आले नाही. ते कोळी कंटेनर एक महिना सामान भरून बंदरात उभा ठेवल्याने अमेरिकेत निर्यात झाले होते. त्यामुळे परदेशासाठी हे खोके बनविताना खूप काळजी घ्यावी लागत असल्याचे पाटील यांनी सांगितले. खोके बनविताना जास्तीत जास्त कागदाचे सात थर रचले जातात. छोटय़ात छोटा ३ बाय ५ चा खोका सध्या बनविला जात आहे. त्यासाठी अलीकडे आतील बाजूने ह्य़ा खोक्यांसाठी जाड प्लास्टिकचे आवरण चढविले जाते. त्यामुळे आतील साहित्य खराब होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. खोके बनविण्याचे हे तंत्रज्ञान पाटील कुटुंबाने अनेकांना शिकविले आहे. त्यामुळे अनेक कामगारांनी तसेच नातेवाइकांनी खोके बनविण्याचे छोटे-मोठे कारखाने सुरू केलेले आहेत. नेरुळ येथील ईएसआय कॉलेज ऑफ पॅकेजिंगचे १५० विद्यार्थी दरवर्षी या कारखान्यातून प्रशिक्षण घेऊन जातात. त्यामुळे पाटील यांचा पेपर पॅक अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणारे महाविद्यालय झाले आहे. पाटील यांची मुलगी आदिती आता व्यवसायात वडिलांना मदत करीत आहे. वेस्टर्न इंडिया कॉरोगेट बॉक्स पेपर इंड्रस्ट्जिचे पाटील ठाणे रायगड जिल्ह्य़ातील एकमेव सदस्य होते. ‘महाराष्ट्र इंड्रस्ट्री असोसिएशन’चा यापूर्वी पाटील यांना १९८७ चा उद्योग पुरस्कार मिळालेला आहे. सामाजिक बांधिलकी जपताना जव्हार-मोखाडा तालुक्यातील आदिवासी मुलांसाठी घरगुती उपयोगाचे साहित्य देणाची सेवा ‘पेपर पॅक’ने कायम ठेवली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Paper pak industries