नवी मुंबई : नवी मुंबईतील सानपाडा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून ८ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्ष देवाण घेवाण वेळी पैसे घेत सोने न देता संशयित निघून गेले होते. . याबाबत सानपाडा पोलीस ठाण्यात संबंधित पाच अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनय नगर मीरा रोड येथे राहणारे प्रेम भानुशाली या २२ वर्षीय युवकाच्या संपर्कात राकेश, राजेश, खन्ना, राजू हे संपर्कात आले होते. त्यांनी प्रेम यांना स्वस्तात सोने मिळू शकते इच्छा असेल तर सांगणे असे सांगितले.
या आमिषाला बळी पडत प्रेम यांनी सोने घेण्याचे ठरवले. यासाठी पैशांची जुळवा जुळव करीत आठ लाखांची रोकड जमा केली. त्यांची बोलणी फेब्रुवारी २०२५ पासून सुरु होती. शेवटी पैशांची जमवा जमव केल्या नंतर सोने दाखवा असे प्रेम यांनी सांगितल्यावर सध्या जवळ नाही. असे राकेश याने सांगितले.
मात्र काही दिवसांनी व्हिडीओ कॉल करून सोन्याची बिस्किटे दाखवली तसेच सोने खरे असल्याची खात्री पटवण्यासाठी परीक्षा करून दाखवली गेली. त्यामुळे प्रेम यांचा संशयितांवर विश्वास बसला. आणि त्यांनी सोने घेऊन येण्याचे सांगितले. हा सर्व घटनाक्रम मीरा रोड परिसरात घडला असला तरी संशयित व्यक्तींनी सोने देत पैसे घेण्यासाठी नवी मुंबईत भेटण्यास सांगितले. २९ जुलैरोजी दुपारी साडे तीन वाजता सानपाडा स्टेशन बाहेर भेटण्याचे ठरले. त्यानुसार राकेश, आणि फिर्यादी प्रेम हे सानपाडा स्टेशन या ठिकाणी भेटले.
जुजबी बोलणे झाल्यावर अंदाजित पंधरा लाखांची तीन सोन्याची बिस्किटे त्यांनी प्रेम यांना दाखवली मात्र त्यांच्या हातात दिली नाही. तर पैशांची मागणी केली. प्रेम यांनी आठ लाखांची रोकड दिल्यावर काही वेळ बोलण्यात गुंगवून ठेवले. आणि काही कळण्याच्या आत त्या ठिकाणी एक गाडी आली त्यातून राजेश, खन्ना, राजू आणि इतर काही अनोळखी व्यक्ती उतरले आणि राकेश याला काय करताय असे विचारात अतिशय घाईत असल्याचे दाखवत सर्वजण गाडीत बसून निघून गेले. त्यांनी प्रेम यांच्या कडून आठ लाखांची रोकड घेतलीच शिवाय सोने न देता निघून गेले. प्रेम यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.मात्र जास्त लोक असल्याने त्यांचे प्रयत्न तोकडे ठरले. शेवटी प्रेम यांनी बुधवारी प्रेम यांनी सानपाडा पोलीस ठाणे गाठत संबंधित लोकांच्या विरोधात तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी राकेश, राजेश, खन्ना, राजू आणि इतर लोकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.