NMIA Inauguration 2025: नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात नवीन “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणे” स्थापन करण्यास औपचारिक मान्यता दिली आहे.राज्य शासनाने सोमवारी (ता. ६) जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, विद्यमान पनवेल शहर आणि उलवा पोलीस ठाण्यांचे कार्यक्षेत्र विभाजित करून हे स्वतंत्र ठाणे उभारले जाणार आहे. उलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढते शहरीकरण ध्यानात घेऊन आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी संख्या लक्षात घेऊन नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी स्वतंत्र विमानतळ पोलीस ठाणे निर्माणाचा प्रस्ताव पाठवला होता.
हा प्रस्ताव विमानतळ सुरू होण्यापूर्वी पोलीस ठाण्यातील कर्मचारी व अधिका-यांची शासन दरबारी पदनिर्मिती, पोलीस ठाणे इमारत बांधणीचे काम होणे आवश्यक असल्याने सिडको मंडळ आणि शासनाकडे वारंवार पोलीस विभागाचा पाठपुरावा सुरू होता. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या या प्रयत्नांना यश आले असून या नव्या पोलीस ठाण्यासाठी १०८ नियमित पदे निर्माण करण्यात आली आहेत. या पदांवरील आस्थापना खर्चासाठी शासनाने ३ कोटी ३८ लाख रुपये आणि इमारतीमधील वाहन व इतर साहीत्यासाठी एक कोटी ७६ लाखांच्या खर्चाची तरतूदीला शासनाने मंजूरी दिल्याचे सोमवारी घेतलेल्या निर्णयात म्हटले आहे.
या ठाण्यात २ पोलीस निरीक्षक, ३ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ६ उपनिरीक्षक, ६ सहाय्यक उपनिरीक्षक, २७ हवालदार, ४२ पोलीस शिपाई, १९ महिला शिपाई आणि ३ चालक पोलीस शिपाई अशी मनुष्यबळाची रचना करण्यात आली आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील एक महत्त्वाचे प्रकल्प असून, त्यामध्ये ४ प्रवासी टर्मिनल, २ धावपट्टी ( रनवे) आणि १ कार्गो ट्रक टर्मिनल उभारले जात आहेत. विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर दरवर्षी ९ कोटी प्रवासी आणि ३६० कोटी मेट्रिक टन मालवाहतूक होणार आहे.
अशा मोठ्या प्रमाणातील वाहतूक आणि गर्दी लक्षात घेता सुरक्षाव्यवस्था मजबूत करणे अत्यावश्यक ठरणार आहे.नवीन पोलीस ठाणे उभारल्याने विमानतळ परिसरात कायदा व सुव्यवस्था, प्रवासी सुरक्षा आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई पोलिसांना विमानतळ परिसरात स्वतंत्र आणि सुसज्ज सुरक्षा यंत्रणा उभारण्याची संधी मिळणार आहे.राज्य शासनाने हा निर्णय वित्त विभागाच्या मंजुरीनंतर अमलात आणला असून, लवकरच ठाण्याच्या हद्दनिश्चितीचा प्रस्ताव शासनास सादर केला जाणार आहे.
गेल्या वर्षभरापासून विमानतळ सुरू झाल्यानंतर वाढती प्रवासी संख्या आणि शेजारचा उलवा नोडमधील वाढती लोकसंख्येमुळे विमानतळासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. माननिय पोलीस आय़ुक्त मिलिंद भारंबे यांनी याबाबत शासनाकडे घेतलेल्या पाठपुराव्यामुळे नवीन पोलीस ठाण्यांचे निर्माण, १०८ पदनिर्मिती तसेच इतर साहीत्यांसाठी लागणारा खर्चाची तरतूद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सध्या विमानतळ क्षेत्रातील पोलीस ठाण्याच्या इमारतीचे काम सुरू आहे. प्रत्यक्षात ज्यावेळी विमानतळावरून उड्डाण सुरू होईल तोपर्यंत अजून निम्मी उर्वरीत पदनिर्मितीला सुद्धा मंजूरी मिळेल आणि पोलीस ठाण्याचे कामकाज सुरू करण्याचे नियोजन आहे. – संजयकुमार पाटील, उपायुक्त, मुख्यालय प्रशासन, नवी मुंबई पोलीस दल