पनवेल – नवी मुंबई पोलीस दलाच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाच्या पोलीसांनी सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजता शीव पनवेल महामार्गावर कामोठे टोलनाक्याजवळ एका टेम्पोमध्ये १७ लाख ४० हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. या प्रकरणी टेम्पो चालकाला अटक केली आहे. या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नवी मुंबई, पनवेल येथील पानटप-यांपर्यंत गुटखा विक्री प्रतिबंधित असताना सुद्धा सूरक्षितरित्या पोहचविणारी बेकायदेशीर यंत्रणा कार्यान्वित आहे. या टोळीबद्दल नवी मुंबई पोलीस दलाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिका-यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी कामोठे पोलिसांच्या माध्यमातून शीव पनवेल महामार्गावर सापळा रचला. सोमवारी सायंकाळी कामोठे टोलनाक्याजवळ टेम्पोला पोलिसांनी थांबवून त्याच्याकडे चौकशी केली.
२३ वर्षीय टेम्पो चालक हा मुंबई येथील कांदिवली (पूर्व) येथील भिमनगरमधील कल्पना विकास मंडळ चाळ येथे राहणारा आहे. त्याने दिलेल्या माहितीप्रमाणे टेम्पोमध्ये २० मोठ्या पिवळ्या रंगाच्या गोण्या आढळल्या. या पिवळ्या गोण्यांमध्ये सुद्धा प्रत्येकी ६ पांढ-या रंगाच्या गोण्या आढळल्या. त्या प्रत्येक पांढ-या रंगाच्या गोणीमध्ये ५८ वेगवेगळी पाकीटे गुटख्याची आढळली. हा सर्वाधिक गुटखासाठ्याचे बाजारमुल्य हे १७ लाख ४० हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगीतले. या प्रकरणी गुटखा वाहतूक करणा-या २३ वर्षीय टेम्पोचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संबंधित प्रकरणातील पाच लाख रुपये किमतीचा टेम्पो सुद्धा पोलिसांनी जप्त केला आहे. पानटपरी विक्रेत्यां पर्यंत हा गुटखा याच टेम्पोच्या माध्यमातून पोहचविण्याचे काम टेम्पोचालक करत असल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासात समोर आले आहे. पण हा गुटखा कोणाच्या मालकीचा होता. त्याचे नवी मुंबई व पनवेलमधील खरेदीदार कोण याची चौकशी पोलीस करत आहेत.