नवी मुंबई : राजकीय श्रेयवादाची लढाई आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे नेरूळच्या शिवस्मरकातील महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे लोकार्पण अद्यापपर्यंत रखडलेले आहे. याबद्दल शिवभक्तांमध्ये तीव्र नाराजीही आहे. मात्र, आज (शनिवार, १८ ऑक्टोबर)दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिवभक्तांनी स्वतः पुढाकार घेत स्मारकाभोवती दिव्यांची आरास रचून शिवरायांना मानवंदना दिली.
यामुळे शिवस्मारक परिसर दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला. यावेळी छत्रपती शिवरायांप्रती आपल्या भावना व्यक्त करताना, “आमच्या राजाला अंधारात ठेवणार नाही,” असा निर्धार व्यक्त करत पुतळ्याच्या रखडलेल्या लोकार्पणाकडे शिवभक्तांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारण्यात आलेले हे स्मारक नेरूळ सेक्टर-१ परिसरातील एक महत्वाचा भाग आहे. यातील छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती गेल्या अनेक महिन्यांपासून झाकून ठेवण्यात आली असून, लोकार्पणासाठी योग्य ‘मुहूर्त’ ठरत नसल्यामुळे सर्व सामान्य नागरिक आणि शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आहे.
यातच दिवाळीसारख्या प्रकाशाच्या आणि आनंदाच्या सणात संपूर्ण शहर रंगीबेरंगी रोषणाईत न्हाऊन निघाले असताना “आमचा राजा मात्र अंधारात!” अशी खंत शिवभक्तांकडून व्यक्त करण्यात येत होती. म्हणूनच, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिवभक्तांनी पुढाकार घेत स्मारक परिसरात दिव्यांची आसार रचून शिवरायांना मानवंदना दिली.
शिवप्रेमींकडून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत सायंकाळी शिवस्मारक परिसराची स्वच्छता करून, शेकडो दिव्यांनी महाराजांच्या पुतळ्याभोवती आरास सजवण्यात आली. यावेळी शिवभक्तांच्या, ‘एक दिवा राजासाठी, माझ्या देवासाठी’ अशा घोषणांनी स्मारक परिसर दुमदुमून निघाला. यानिमित्ताने दीर्घकाळ अंधारात राहिलेला महाराजांचा पुतळा अखेर दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला.
शिवभक्तांच्या या प्रतीकात्मक आंदोलनातून त्यांनी केवळ महाराजांप्रती आपली श्रद्धाच व्यक्त केली नाही, तर स्मारकावरील राजकीय दुर्लक्ष आणि पालिकेच्या उदासीन कारभारावरही तीव्र नाराजी नोंदवली. नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत, “श्रेयवादासाठी राजकीय कुरघोडी थांबवून महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण तत्काळ करावे,” अशी मागणी केली आहे.
दरम्यान, पालिकेकडून याबाबत अद्याप कोणतेही ठोस उत्तर मिळाले नसल्याने शिवभक्तांचा संताप वाढला असून, सकल मराठा समाजाने याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापूर्वी सकल मराठा समाजाकडून महापालिका प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनानुसार, दिवाळीपूर्वी पुतळ्याचे लोकार्पण झाले नाही, तर २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता समस्त शिवभक्तांच्या उपस्थितीत हे लोकार्पण केले जाईल. असे सांगण्यात आले आहे. तसेच प्रशासनाने यात अडथळा आणत आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी आम्हाला त्याची पर्वा नाही असे सकल मराठा समाजाने म्हटले आहे.
महाराजांना या अवस्थेत जास्त काळ ठेवणे आम्हाला सहन होत नाही. त्यामुळे दिलेल्या मुदतीत लोकार्पण न झाल्यास यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. असा निर्वाणीचा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.