नवी मुंबई – नवी मुंबई विमानतळाचा शुभारंभ सोहळा येत्या ३० सप्टेंबर रोजी आयोजित करण्याची जोरदार तयारी सध्या राज्य सरकार स्तरावर सुरू आहे. सिडको महामंडळात यासंदर्भातल्या बैठकांचा सपाटा सुरू झाला असून या प्रकल्पाच्या शुभारंभ सोहळा नेमका कसा असेल याची तयारी सुरू झाली आहे.
दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचं विशेष विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर सर्वप्रथम उतरेल अशा पद्धतीची आखणी केली जात आहे. त्याच विमानाने परतीचा प्रवासही करणार आहेत. ३० सप्टेंबर रोजी विमानतळाचे भव्य उदघाटन होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
उद्घाटनासाठी अवघे १४ दिवस शिल्लक राहिले असून, सिडको मंडळ आणि विमानतळ प्रकल्पाशी संबंधित विविध स्तरांवर बैठका आणि तयारी सुरू आहे. पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या या कार्यक्रमाबाबत सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली आहे; तरीही अद्याप अधिकृतपणे कोणत्याही उच्चपदस्थ अधिका-यांनी याविषयी भाष्य केलेले नाही. यापूर्वी अनेकदा विमानतळावरील धावपट्टीच्या चाचणीसाठी या विमानतळावर सैन्य दलाचे विमान यशस्वीरित्या उतरवण्यात आले आणि त्या विमानाने यशस्वीपणे उड्डाणही केले. परंतू ३० सप्टेंबरला अधिकृतपणे पंतप्रधान प्रवास करत असलेले विमान धावपट्टीवर उतरवून, उदघाटनाच्या कार्यक्रमानंतर पुन्हा त्याच विमानाने आकाशात भरारी घेतल्यानंतर विमानतळाचे अधिकृत उदघाटन जाहीर करण्याचे नियोजन असल्याची चर्चा आहे.
उदघाटनानंतर प्रत्यक्षात विमानतळावरून विमानउड्डाणाला अजून एक ते दिड महिन्यांचा कालावधी लागेल. यामध्ये विमानतळाच्या सूरक्षेचे केंद्रीय सूरक्षा यंत्रणेकडे म्हणजे सीमा शुल्क विभाग, पारपत्र विभाग तसेच सीआयएसएफ या यंत्रणांकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया केली जाईल. तसेच विमानतळाच्या स्वच्छता आणि अंतिम टप्यातली कामे या दरम्यान उरकवून घेतली जातील. ऑक्टोबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने, निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विमानतळाचे उदघाटन करण्यासाठी सरकारी पातळीवर वेगाने हालचाली सुरू असल्याचे समजते.
गेल्या अनेक वर्षांपासून या विमानतळाच्या उभारणीसाठी केंद्र आणि राज्य प्रशासनाने मोठे प्रयत्न केले आहेत. विमानतळाच्या भूमिपूजनाचा मानही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला होता, आणि आता उदघाटनही त्यांच्या हस्ते होत असल्याने भाजपसह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अधिकृत नाव अद्याप जाहीर झाले नसले तरी स्थानिक स्तरावर पनवेल व उरण येथील भाजप आमदारांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही दि. बा. पाटील यांच्या नावासाठी वाहनफेरी काढून सरकारचे लक्ष वेधले.
३० सप्टेंबरला पंतप्रधान धावपट्टीवर उतरल्यावर विमानतळाच्या प्रगतीचा आढावा घेतील. अदानी कंपनी व सिडकोचे अधिकारी त्यांना प्रकल्पाची सविस्तर माहिती देतील. त्यानंतर एका भव्य कार्यक्रमात विमानतळाच्या उदघाटनाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
प्रकल्पग्रस्तांचे लक्ष्य पंतप्रधानाच्या भाषणाकडे…
पंतप्रधान या उदघाटन सोहळ्यातील त्यांच्या भाषणात विमानतळाचे नाव जाहीर करू शकतात, अशी चर्चाही रंगली आहे. गेल्या दोन वर्षांत रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनी भाजपच्या नेतृत्वाखाली दि. बा. पाटील यांचे नाव या विमानतळाला मिळावे यासाठी आंदोलन आणि निदर्शने केली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनेक सभांमध्ये केंद्र आणि राज्य सरकार विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत सकारात्मक असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे उदघाटनाच्या दिवशी दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर होताच, रायगड व ठाणे येथील प्रकल्पग्रस्त नवरात्रोत्सवात दिवाळी साजरी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.