उरण : खोपटा पूल ते कोप्रोली मार्गावरील खड्ड्यांचे विघ्न आता लवकरच दूर होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या मार्गावरील एक किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी शासनाने ७ कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी आणि वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.

खोपटे पूल ते कोप्रोली मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. त्यामुळे कित्येक दुचाकीस्वार या रस्त्यावरून प्रवास करीत असताना तोल जाऊन पडत आहेत. विशेषत: रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज येत नसल्याने ही अडचण निर्माण होत आहे. विशेष म्हणजे साइड पट्ट्यांच्या बाजूला तसेच गतिरोधक लक्षात यावा याकरिता रेडियमयुक्त पांढरा रंग द्यावा लागतो, तोही देण्यात आलेला नाही. ही परिस्थिती कोप्रोली – खोपटा पूल मार्गावर नाही तर संपूर्ण उरण पूर्व विभागात पाहायला मिळते.

हेही वाचा…26 हजार घरांच्या सोडत प्रक्रियेस मुदतवाढीचा प्रस्ताव विचाराधीन

एकीकडे नादुरुस्त रस्ता तर दुसरीकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे असलेले कंटेनर, ट्रेलरमुळे नागरिक मेटाकुटीला आले असून, या रस्त्यावर छोटे मोठे अपघात नागरिकांच्या पाचवीला पुजले आहेत. हा रस्ता सर्वसामान्य नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावर खडी टाकण्यात आली होती. ती खडी पावसामुळे व अवजड वाहतुकीमुळे वाहून गेली आहे.

रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खोपटा-कोप्रोली रस्त्याची दुरवस्था झाली आहे. उरण पूर्व विभागातील खोपटा पूल हा कोप्रोली, पिरकोन, आवरे, गोवठणे, वशेणी, पाले, मोठी जुई, कळंबुसरे, चिरनेर पेण, अलिबाग तालुक्यातील गावांना उरण पश्चिम विभाग, उरण शहर, पनवेल, नवी मुंबई व मुंबईशी जोडणारा हा मुख्य मार्ग आहे. खोपटा-कोप्रोली मार्ग पूर्व विभाग तसेच पेण अलिबाग, मुंबई नवी मुंबई व पनवेलशी जोडणारा दुवा आहे. त्यामुळे नेहमी प्रवास करतो, मात्र या रस्त्याची दुरवस्था झाली आहे व खड्ड्यांचा सामना करावा लागत असल्याचे मत अमित म्हात्रे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा…फ्लेमिंगोंच्या अधिवासात रस्ता नको, राज्य सरकारच्या पाहणी पथकाच्या अहवालात खाडीकिनारचा रस्ता बंद करण्याची शिफारस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खोपटे पूल ते कोप्रोली मार्गाच्या एक किलोमीटर मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून त्यासाठी ७ कोटी रुपयांची निविदा आठवड्यात मंजूर होणार असून, लवकरच ठेकेदारामार्फत काम सुरू करण्यात येणार आहे.

  • नरेश पवार, अतिरिक्त अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग