‘सिटी सव्‍‌र्हे’ आणि गावांच्या वेशी अद्याप ठरविल्या नाहीत
बेकायदा बांधकामावरून नवी मुंबईत प्रकल्पग्रस्त आणि पालिका यांच्यात संघर्ष सुरू असताना पनवेलमधील प्रकल्पग्रस्तांची घरेही धोक्यात आली आहेत. पनवेल येथील प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या बांधकामांबाबत सरकारने वेळीच अध्यादेश न काढल्यास नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांप्रमाणेच पनवेलच्या प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाईची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. ‘सिटी सव्‍‌र्हे’ आणि गावांच्या वेशी ठरविल्या न गेल्याने महानगरपालिका निर्मितीआधी सरकारने गावठाण विस्ताराचा प्रश्न हाती घेणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. ३२ वर्षांपूर्वी सिडकोने पनवेल तालुक्यात वसाहती उभारण्याकरीता जमिनींचा ताबा घेतला. त्याचवेळी संबंधीत गावांच्या वेशी न ठरविल्यामुळे आणि गावठाण विस्तार योजना तसेच गावांचा ‘सिटी सव्‍‌र्हे’ न केल्याने पनवेलच्या प्रकल्पग्रस्तांची घरे बेकायदा ठरली आहेत. गावठाणामध्ये गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणे ही मूळ मागणी सरकारकडे प्रलंबित असताना पनवेल महानगरपालिका निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे. काही प्रकल्पग्रस्तांनी गावठाण विस्तारात बहुमजली बांधकाम उभारले आहे. त्यातील सदनिकांची विक्री करून पैसा मिळविला जात आहे. सिडकोने पनवेलमध्ये तळोजा पाचनंदनगर, नावडे, उलवा, करंजाडे हे नोड आणि कळंबोली, खारघर, कामोठे, नवीन पनवेल, खांदेश्वर या वसाहती उभारल्या. प्रत्येक वसाहती या गावांच्या शेजारी वसल्यामुळे आज २५ वर्षांनंतर या वसाहतींचा विस्तार गावाला खेटून झाला आहे. ज्याप्रमाणे सिडकोने वसाहतींचा विस्तार केला त्याचप्रमाणे काही काळानंतर तेथील ग्रामस्थांनी गावठाण भागात घरे बांधली. काहींनी नैसर्गिक घरांच्या जागेवर गाळे व सहा मजली इमारती बांधल्या आहेत. सिडकोने १९७० जाहीर अधिसूचना काढून १९८४ रोजी प्रत्यक्षात पनवेलच्या जमिनीचा ताबा घेऊन त्यावर वसाहती वसविल्या आहेत. सध्या सिडकोने नैना प्रकल्पाद्वारे २७० गावांचा विकास करण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. या त जाचक अटी विकासकांवर घातल्यामुळे आजही पनवेलच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा भाव घसरलल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. सरकारने पनवेल महानगरपालिका करण्याअगोदर पनवेलच्या स्थानिकांचे प्रश्न सोडवावे अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील केली आहे. सिडकोने सीटी सव्‍‌र्हे व गावांच्या वेशी करणे का टाळले याबाबात सिडकोचे जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांच्याशी संपर्क साधला मात्र तो होऊ शकला नाही.