78 वर्षाच्या पक्षाचे कसे करणार प्रबोधन याविषयी उत्सुकता…..
पनवेल – ७८ वा वर्धापनदिन भारतीय शेतकरी कामगार पक्ष नवीन पनवेलमध्ये शनिवारी साजरा करत असताना शेकापच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षबांधणीची उर्जा मिळण्यासाठी यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना खास पाहुणे बोलावण्यात आले आहे. ठाकरे यांच्या प्रबोधनातून यापुढे शेकापची मोट बांधण्याचा प्रयत्न शेकापचे माजी आ. जयंत पाटील यांनी केला आहे.
नवीन पनवेल येथील पोलीसांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर शेकापचा शनिवारी वर्धापनदिनावेळी महाविकास आघाडीतील शिवसेनेचे संजय राऊत, कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शशिकांत शिंदे हे सुद्धा व्यासपिठावर मुख्य पाहुण्यांमध्ये आमंत्रित आहेत. एकसंघाने भाजपविरोधी मोट बांधण्याचा राज्यातील प्रयत्नाची पनवेलमधून सुरूवात केली जात आहे. सूमारे ५ ते ८ हजार कार्यकर्ते या वर्धापनदिनासाठी जिल्ह्यातून नवीन पनवेल येथे येणार आहेत.
जे. एम. म्हात्रे यांनी शेकापला रामराम ठोकल्यानंतर शेकाप संपला असे वृत्त पनवेलमध्ये पसरविण्यात आले. मात्र मूठभर निष्ठावंतांची मोट बांधत शेकापचे माजी आ. बाळाराम पाटील आणि सरचिटणीस काशिनाथ पाटील यांनी पनवेलच्या रिक्त पदांवर नव्या नेमणूका करून पक्षाची वाताहत थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तीन आठवड्यांपूर्वी माजी आ. दत्तूशेठ पाटील यांच्या नावडे येथील स्मारकाचे लोकार्पण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
हा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेचा असला तरी यावेळी शेकापने शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. कर्नाळा बॅंक गैरव्यवहारात अडकलेले शेकापचे माजी आ. विवेक पाटील हे जून २०२१ पासून तळोजा मध्यवर्ती कारागृहात आहेत. शेकाप मागील अनेक निवडणूकांमध्ये कोणताही करिश्मा दाखवू शकला नाही.
महाविकास आघाडीतूनच यापूढे निवडणूकांमध्ये यश मिळू शकेल असे चित्र असताना शेकापने वर्धापनदिनी मनसेला मुख्य व्यासपिठ दिल्यामुळे नव्या मित्रासोबत महाविकास आघाडीची चूल मांडण्याचा प्रयोग माजी आ. जयंत पाटील यांच्याकडून सुरू आहे. ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्षशेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि शहरातील नागरिकांनी दूर केलेल्या शेकापच्या मेळाव्यात नैना प्रकल्पातील शेतक-यांची व्यथा, भूसंपादनात हद्दपार झालेला पनवेल उरणचा शेतकरी, ५५ वर्षानंतरही साडेबारा टक्के योजनेचे भूखंड न मिळालेले शेतकरी, स्मार्ट शहर पण पाण्याची वणवण, सर्वाधिक रस्ते अपघातामध्ये प्राण गमावणारे शहर अशा सर्व गंभीर विषयांवर राज ठाकरे काय बोलतील याकडे सा-यांचे लक्ष लागले आहे.