नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील व्यावसायिकांचे  सततच्या टाळेबंदीमुळे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मार्चपासून सततच्या टाळेबंदीनंतर १५ ऑगस्टपासून ३० दिवस दुकाने उघडी ठेवण्यास पालिका आयुक्तांनी परवानगी दिली. त्यानंतर शहरात सरसकट दुकाने उघडण्यास सुरवात झाली. मात्र, टाळेबंदीमुळे अद्यापही ३० टक्के  व्यावसायिक गावी गेल्याने शहरातील ३० टक्के दुकाने बंद आहेत.

जुलैमध्ये ‘मिशन बिगीन अगेन’द्वारे शहरातील दुकाने सम-विषम तारखेस सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर पुन्हा १५ दिवसांची टाळेबंदी जाहीर झाली. त्यानंतर सम-विषम तारखेस दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली, तर १५ ऑगस्टपासून शहरातील अतिसंक्रमित आणि प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्वच दुकाने ३० दिवस सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. अद्यापही दुकानांत ग्राहकांकडून योग्य प्रतिसाद नसल्याची माहिती व्यापारी संघाने दिली आहे. तर काही भागांत नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत असल्याचे चित्र आहे.

काही विभागांत ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असल्याचे चित्र आहे.परंतू शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या वाशी विभागात तुरळक गर्दी होती. करोनामुळे शाळा बंद पण ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने स्टेशनरी दुकानांत गर्दी पाहायला मिळाली.

३० हजार दुकाने असून सततच्या टाळेबंदीमुळे ३० टक्के दुकाने बंदच आहेत. व्यापारी त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. तर १५ ऑगस्टपासून  सर्व दुकाने सुरू होऊनही ग्राहकांकडून म्हणावा तितका प्रतिसाद नाही. त्यामुळे व्यावसायिंकांची आर्थिक कोंडी सुरूच आहे.

– प्रमोद जोशी, अध्यक्ष,नवी मुंबई व्यापारी महासंघ